उल्हासनगर : महायुतीकडून हजारो कोटीच्या निधीतून विकास कामे सांगण्यात येते. तर दुसरीकडे शहरातील रस्त्याची अवस्था बघता पावसाळ्यात नागरिकांना बोटीद्वारे प्रवास करण्याची वेळ येणार असल्याची टीका कल्याण लोकसभेचे उमेदवार प्रशांत इंगळे यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
कल्याण लोकसभेतील निवडणुकीत रंग भरण्यास सुरवात झाली असून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. कल्याण लोकसभेचे बीएसपी पक्षाचे उमेदवार प्रशांत इंगळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत घेऊन, लोकसभाक्षेत्रा अंतर्गत सुरू असलेल्या हजारो कोटीच्या विकास कामावर प्रश्नचिन्हे उभे केले. कल्याण शहराला हजारो कोटीचा निधी देऊनही शहर स्मार्ट सिटी झाले का? तसेच मुंब्रा, कळवा, कल्याण, ग्रामीण कल्याण, उल्हासनगर व अंबरनाथ शहरातील झोपडपट्टी काय अवस्था आहे? लोकल रेल्वेचा प्रवास सुकर झाला का? ग्रामीण परिसरातील नागरिकांची पाण्याची वणवण थांबली का? असे अनेक प्रश्न उभे केले. तसेच निवडणूक भरारी पथकाचे अधिकारी व कर्मचारी संशयित व व्हीआयपी गाडीची तपासणी करण्या ऐवजी सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याचा आरोपही इंगळे यांनी केला.
कल्याण लोकसभेतील नागरिकांनी विचार करून परिवर्तन घडून आणणार असल्याचा विश्वास त्यांनी पत्रकार परिषेदेत व्यक्त केला. लोकसभेत एकतर्फी निवडणूक नसून तिरंगी असल्याचे इंगळे म्हणाले. तसेच उल्हासनगरसह इतर शहरातील रस्त्याची अवस्था बघता शासनाने पावसाळ्यात नागरिकांच्या प्रवासासाठी बोटी खरेदी करीन बोटिंगची व्यवस्था करावी. असेही इंगळे म्हणाले.