ठाणे : पूर्ववैमनस्यातून कोपरी भागातील एका गुंडाचा खून करून त्याचा मृतदेह खाडीकिनारी पुरणाऱ्या दोघांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आरोपींमध्ये अवघ्या १६ वर्षे वयाच्या आणखी दोन बालगुन्हेगारांचाही समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कोपरी भागातील मस्ताननगरात राहणारा द्वारकानाथ उर्फ जयेश सोपान गावंड (वय १९) आणि याच परिसरातील राजनगर झोपडपट्टीत राहणारा सचिन उर्फ बांग्या रायसिंग नरवाडे (२८) यांच्यात नेहमी भांडणे व्हायची. २९ एप्रिल रोजी जयेश आणि सचिन कोपरीतील खाडीकिनारी गेले होते. त्यांच्यासोबत राजनगर झोपडपट्टीतील सचिन हरपाल राजोरिया (१८) याच्यासह आणखी दोन मुले होती. काही दिवसांपूर्वी जयेश गावंड याला काही मुलांनी मारहाण केली होती. ती मुले सचिन नरवाडे यानेच पाठवली, असा जयेशला संशय होता. या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातूनच चारही जणांनी सचिनला जबर मारहाण केली. डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह खाडीकिनारी पुरला. इकडे सचिन घरी न परतल्याने त्याच्या आईने शोधाशोध सुरू केली. १ मे रोजी सचिनच्या आईने तो बेपत्ता असल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात दिली. बुधवारी सचिनच्या आईला त्याची चप्पल खाडीकिनारी सापडली. तिने परिसरात चौकशी केली असता, सचिन चौघांसोबत २९ एप्रिल रोजी खाडीकिनारी आला होता, अशी माहिती मिळाली. सचिनच्या आईने ही माहिती कोपरी पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी आरोपींना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. जयेश गावंड आणि सचिन राजोरिया यांना न्यायालयाने ८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. उर्वरित दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील सुधारगृहात करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सचिन नरवाडे याला गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. खंडणी, हाणामारी, प्राणघातक हल्ल्यासारखे १२ गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गुंडाचा खून करून मृतदेह खाडीकिनारी पुरला
By admin | Published: May 05, 2017 4:15 AM