- वसंत पानसरेकिन्हवली : माणूस जिवंत असेपर्यंत त्याला अनेक अडचणी, समस्यांना सामोरे जावे लागते. प्रसंगी जीवनात संघर्ष करावा लागतो. पण किन्हवलीतील चरीव गावातील ग्रामस्थांना मरणानंतरही यातना भोगाव्या लागत आहेत. गावापासून अर्धा किलोमीटरवर स्मशानभूमी आहे. पण तिथे जाण्यासाठी नदीपात्रातून जावे लागते. आजपर्यंत तेथे रस्त्याच झाला नाही. या नदीपात्राच्या भोवती काहींची शेती असल्याने तेही रस्त्यासाठी जमीन देण्यास तयार होत नाही. जर तेथील काही जमीन रस्त्यासाठी दिली तर मृतदेह नदीपात्रातून घेऊन जावा लागणार नाही, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले.चरीव येथे अंत्यविधीसाठी असणारी स्मशानभूमी नादुरुस्त असून मोडकळीस आली आहे. पाच वर्षांपूर्वी या स्मशानभूमीची दुरुस्ती केली होती. पण आज त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येथील लाद्याही उखडल्या आहेत. शेडवरील पत्राच उडाल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यास त्रास सहन करावा लागतो. या नदीपात्राच्या बाजूला असलेल्या शेतावर जाण्यासाठी कामगार बांधाचा वापर करतात. पण तेथून मृतदेह घेऊन जाता येत नाही. रस्ताच नसल्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांना नदीच्या खोल पात्रातून मृतदेह घेऊन जावा लागतो. पावसाळ्यात मृतदेह घेऊन जाताना काही अघटित घडले तर कोण जबाबदार, असा सवाल ग्रामस्थांनी विचारला आहे.गावात दुसरी स्मशानभूमी आहे, पण ती लांब असून तेथे आदिवासी मृतदेह जाळतात. त्यामुळे याच स्मशानभूमीचा ग्रामस्थांना आधार आहे. जर सतत पाऊस पडत राहिल्यास नदी भरून वाहते. अशा वेळी कुणाचे निधन झाल्यास पाऊस थांबण्याची आणि नदीतील पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागते, असेही ग्रामस्थांनी या वेळी सांगितले.शहापूर तालुक्यात फक्त दोन ग्राममंडळ असून त्यापैकी एक चरीव आहे. आजमितीस दोन हजार लोकसंख्या असलेले गाव अनेक सुविधांपासून वंचितच आहे. येथील ग्राम मंडळ कमिटी बरखास्त केली असून सध्या प्रशासक म्हणून ग्रामसेवक काम पाहत आहेत. सरकारच्या अनेक योजना भ्रष्ट अधिकारी व मुजोर लोकप्रतिनिधी यांच्यामुळे पोहोचल्या नसून आजही गाव विकासापासून कोसो दूर आहे.दरम्यान, गावाचा कारभार हा प्रशासकाच्या हातात असल्याने गावातील विकासकामांवरही होतो.स्मशानभूमीसाठी रस्त्याचा प्रस्ताव पुढे पाठवला असून पावसाळ््यानंतर रस्त्याचे कामकेले जाईल.- एस. एच टोहके, प्रशासक
अंत्यविधीसाठी नदीतून घेऊन जावा लागतो मृतदेह, चरीव येथील वास्तव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 6:55 AM