कल्याण : शहाड-कल्याण रेल्वेस्थानकादरम्यान लोकलमधून नाल्यात पडलेल्या तरुणाला बाहेर काढण्याऐवजी अनेक जण त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात मग्न झाले होते. मात्र, लोकलने प्रवास करणाऱ्या रमीज शेख (१९, रा. मोहने) याने शहाड स्थानकात उतरून घटनास्थळ गाठले. पोलीस चौकशीचे शुक्लकाष्ट मागे लागेल, याची चिंताही न करता त्याने नाल्यात पडलेल्या तरुणाचा शोध घेत त्याचा मृतदेह बाहेर काढला.शहाड आणि कल्याणदरम्यान लोकलने प्रवास करताना सोमवारी सकाळी दोन तरुण रेल्वेमार्गाखालील नाल्यात पडले होते. त्यातील एक तरुण कसाबसा बाहेर पडला आणि पळून गेला. मात्र, दुसरा तरुण नाल्यात बुडू लागला. हा सर्व प्रकार लोकलने प्रवास करणाºया शेखने पाहिला. तो कसारा लोकलने आंबिवलीकडे निघाला होता. त्यावेळी त्या तरुणाच्या पायाची हालचाल होत असल्याचे शेखला दिसले. लोकल शहाडला पोहोचताच तो त्यातून उतरला आणि थेट त्याने रुळांतून चालत नाला गाठला. शेखला तो तरुण दिसताच स्वत: नाल्यात उतरला. यावेळी काही जण मोबाइलमधून घटनेचे फोटो आणि चित्रीकरण करताना त्याला दिसले. शेखने त्या तरुणाला वाचवण्यासाठी त्यांच्याकडे मदत मागितली. मात्र, केवळ दोनच जण धावून आले. या तिघांनी मिळून त्या तरुणाला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. तेव्हा तेथे जमलेल्यांपैकी एकाने ‘पोलिसांचा ससेमिरा तुझ्यामागे लागेल, तेव्हा तू येथून निघून जा,’ असे सांगितले. परीक्षा असल्याने शेखही तेथून निघून गेला.घटनेच्या दुसºया दिवशी, याबाबतचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यात आपला फोटो असल्याचे शेखच्या लक्षात येताच त्याने आपल्या वडिलांसोबत महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.‘तो’ अद्याप अज्ञातचमृत्युमुखी पडलेल्या तरुणाची अजूनही ओळख पटलेली नाही. त्याच्याजवळ ‘फ्युचर ग्रुप’ नाव असलेले एक की-चेन सापडले आहे. त्याआधारे त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे. तसेच तो महाविद्यालयीन विद्यार्थी असण्याची शक्यता असल्याने आसपासच्या परिसरातील महाविद्यालये, क्लास येथेही आम्ही चौकशी करत आहोत, असे महात्मा फुले चौक पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी सांगितले.
नाल्यातून काढला ‘त्या’चा मृतदेह; लोकल अपघात : जीव वाचवण्याचा प्रयत्न फोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:49 AM