ठाणे : ठाण्यातील कशेळी खाडीत शुक्रवारी एका ५० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थान कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली, तो मृतदेह कापूरबावडी पोलिसांच्या स्वाधीन केला.
हा मृतदेह तीन ते चार दिवसापूर्वी खाडीत पडलेला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रदीप धनराज विसावे (५०) असे मृत व्यक्तीचे नाव असून ,ते पालघर येथील रहिवासी आहेत.
कशेळी खाडीत एका इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांसह ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी, अग्निशमन विभाग आणि टीडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन खाडीतून मृतदेह बाहेर काढला, त्यावेळी शरीरावर माशांनी चावा घेतल्याचे दिसून आले. त्यामुळे मृत व्यक्ती तीन ते चार दिवसापूर्वी खाडीत पडली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मृताची ओळख त्याच्याकडे आढळलेल्या आधारकार्डवरून पटल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.