डोंबिवलीः डोंबिवलीच्या हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील स्व. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडा संकुलात केडीएमसीने कोव्हिड सेंटर सुरू केले आहे. दरम्यान गुरुवारी सकाळी या सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा मृतदेह पश्चिमेतील खाडीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संबंधित रुग्णाचे वय ५३ वर्ष आहे. ते पश्चिमेतील मोठा गाव-ठाकुर्लीत वास्तव्याला होते.कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 20 जुलै रोजी पूर्वेतील क्रीडा संकुलातील कोव्हीड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल केले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना 8 दिवसांनी घरी पाठविण्यात आले. मात्र श्वासोच्छश्वास घेण्यास त्रास सुरू झाल्याने पुन्हा त्यांना याच कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी 7 च्या सुमारास त्यांनी मित्राला फोन केला. त्यानंतर मोबाईल तेथे ठेऊन ते सेंटरच्या बाहेर पडले. त्यांच्या मुलाने वडिलांच्या मोबाईलवर सतत संपर्क केला. मात्र वडील प्रतिसाद देत नव्हते.म्हणून त्याने सेंटरशी संपर्क साधून वडील कुठे आहेत, याची माहिती विचारली. मात्र तेथिल कर्मचाऱ्यांनी आम्हाला माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुलाने मानपाडा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी क्रीडा संकुलातील सेंटरवर जाऊन चौकशी केली असता त्यांनाही रुग्णाबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले. याच दरम्यान बेपत्ता झालेल्या आपल्या वडिलांचा मित्रांसह शोध घेत असताना पश्चिमेला खाडी किनारी गर्दी दिसून आली. तेथे जाऊन पाहिले असता वडीलांचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय असून याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रुग्णाच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या यंत्रणेबाबत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान याबाबत कोव्हीड सेंटरच्या अधिका-यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
कोव्हिड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या रुग्णाचा खाडीत आढळला मृतदेह, आत्महत्या केल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 11:17 PM