भातसानगर - शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात एका गर्भवतीचा मृतदेह तब्बल ३० तासांहून अधिक काळ रुग्णालयात पडून असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. या महिलेचा पती मात्र आपल्या पत्नीचा मृतदेह टाकून फरार झाल्याचीही माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री ८ वाजता शवविच्छेदन झाले.यासंबंधात मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी विद्या संतोष माने (३२) ही नऊ महिन्यांची गर्भवती पती संतोष माने यांच्याबरोबर उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आली होती. तेव्हाच तिला झटके आल्याने तिची अवस्था बिकट झाली. तिच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. मात्र, १० ते १५ मिनिटांनी तिचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्या पतीला देण्यात येताच, त्याने तेथून पोबारा केला. या महिलेच्या मृत्यूची माहिती तत्काळ शहापूर पोलिसांना देण्यात आली. मात्र, हा गुन्हा वासिंद परिसरात झाल्याने याची माहिती वासिंद पोलिसांना देण्यात आल्याचे शहापूर पोलिसांनी सांगितले. तरीही, या महिलेच्या मृत्यूला ३० तासांहून अधिक कालावधी लोटला असतानाही या महिलेचे शवविच्छेदन झालेले नव्हते.या प्रकाराबद्दल वासिंद पोलिसांकडे चौकशी केली असता हे जोडपे ५ तारखेपासूनच वासिंद येथील मानस बिल्डिंगमध्ये राहायला आल्याचे सांगण्यात आले. तेथे पोलिसांनी चौकशी केली असता, ती बदलापूर येथे राहत असल्याचे समजताच तेथेही चौकशी केली. मात्र, तेथेही तिच्या पतीचा शोध लागला नाही. पोलिसांनी आपली अधिक चौकशीची सूत्रे नालासोपारा येथे हलवल्यानंतरही त्याचा पत्ता लागला नाही. मृत महिलेच्या पतीचा श्ोोध सुरू असल्याचे वासिंदचे पोलीस निरीक्षक गंगाराम वळवी यांनी सांगितले.या महिलेच्या मृत्यूनंतर लगेचच याची खबर शहापूर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली. ३० तासांहून अधिक काळ लोटला, तरी कुणीच चौकशीसाठी आले नाही. त्यामुळे हा मृतदेह शवागृहात पडून होता.- डॉ. राजेश मस्के,वैद्यकीय अधीक्षक
गर्भवतीचा मृतदेह ३० तासांहून अधिक काळ पडून
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 4:58 AM