ठाणे : मंगळवारी दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे कळवा, वागळे इस्टेट आणि कोरम मॉल येथील नाल्याचा परिसर अशा वेगवेगळया भागातून तिघेजण बुडाले. तिघांपैकी रजिना शेख (३२, रा. कळवा) आणि शाहीद शेख (२८, रा. रामनगर) या दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर नितिन कंपनीजवळील नाल्यात बुडालेल्या गौरी अशोक जयस्वाल या तीन वर्षीय मुलीचा अद्यापही शोध सुरुच असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.कळव्यातील शांतीनगर भागात राहणारी रजिना ही महिला दुपारी मुसळधार पावसात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नाल्यात बुडाली. पोहता न आल्यामुळे या पाण्यात बुडून तिचा मृत्यु झाला. रात्री उशिरा तिचा मृतदेह हाती लागल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. तर येऊरच्या मामा भाच्चे डोंगरावर काही कामानिमित्त गेलेला शाहीद डोंगरावरील पाण्यात पाय निसटल्यामुळे सटकला. तिथून तो वागळे इस्टेट मार्गावरील नाल्याने थेट चार ते पाच किलो मीटर लांब असलेल्या पाण्यात अग्निशमन दलाला मिळाला. तर आपल्या वडीलांच्या हातातून कोरम मॉल परिसरातून निसटलेली गौरी या मुलीचा दुपारपासून वागळे इस्टेट पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या पथकाकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र रात्री १२ वाजेपर्यंतही तिचा शोध लागू शकला नव्हता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
चिखलवाडीतून ३० रहिवाशांची सुटकानौपाडयातील भास्कर कॉलनी भागातील चिखलवाडी येथील एका इमारतीच्या तळमजल्यापर्यंत पाणी शिरले होते. रात्री ७.३० ते १०.३० या दोन तासांमध्ये नौपाडा पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने महामार्गालगतच्या सेवा रस्त्यालगत असलेल्या इमारतीमधून १९ तर आतील इमारतीमधून ११ अशा ३० रहिवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. या इमारतींमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, संजय धुमाळ, प्रकाश पाटील, हवालदार संजय चव्हाण, सुभाष पाटील, शब्बीर फरास आणि अनिल राठोड आदी त्याठिकाणी पोहचले. कोणतीही साधने हाताशी नसल्यामुळे चव्हाण आणि सुभाष पाटील या दोन पोलीस शिपायांनी तर पाण्यातून पोहून काही रहिवाशांची सुटका केली. काही वेळाने अग्निशमन दलाचे जवान तिथे आल्यानंतर त्यांनी बोटीच्या सहाय्याने याठिकाणी काही जणांची सुटका केली. एका इमारतीमधील मिश्रा कुटूंबातील दोघे भाऊ हे त्यांची पत्नी आणि चार मुलांसह अडकले होते. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगूनही ते घराबाहेर पडायला तयार नव्हते. अखेर या आठ जणांनाही भर पाण्यातून जबरदस्तीने बाहेर काढल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.