ठाणे : कळवा खाडीत सुरज पांडे (२५, रा. घोडबंदर रोड, ठाणे) या एका बारमधील वेटरचा मृतदेह आढळला. खाडीत तीन पोलीस ठाण्यांच्या सीमेवर तो आढळल्याने नेमक्या कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत तो पडला, यावरून वाद रंगला होता. अखेर, कोपरी पोलिसांनी तो बाहेर काढून ठाणेनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही हत्या की आत्महत्या, याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कोपरी, कळवा आणि ठाणेनगर या तीन पोलीस ठाण्यांच्या सीमेवर असलेल्या जोशी-बेडेकर ठाणा कॉलेजजवळील कळवा खाडीमध्ये मृतदेह तरंगताना काही लोकांना गुरुवारी सकाळी आढळला. कोपरी पोलीस ठाण्याचे जमादार कोळी यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाच्या पॅण्टच्या खिशात घोडबंदर रोडवरील ‘ठगलाइट बार’चे ओळखपत्र मिळाले. तो मूळचा नेपाळचा असून घोडबंदर भागात वास्तव्याला होता. त्याचे पवई भागात नातेवाईक असून भाऊ चंदीगढला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही ठिकाणी संपर्क साधला. सुरज दोनच दिवसांपूर्वी पवईत येऊन गेल्याचेही त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान, मृतदेह दोन दिवसांपासूनच पाण्यात पडल्याचे मृतदेहाच्या अवस्थेवरून डॉक्टरांनी सांगितले. शुक्रवारी भाऊ आल्यानंतर त्याच्याकडे मृतदेह सोपवण्यात येणार आहे. त्याचा कोणाशी वाद झाला की, प्रेम प्रकरण होते? त्याने आत्महत्या केली की, त्याची कोणी हत्या केली, या सर्व बाबींचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.