मीरारोड : मेडिक्लेमची मंजुरी आलेली नसल्याने बिलाची रोख रक्कम भरा अन्यथा मृतदेह ताब्यात न देण्याचा पवित्रा मीरा रोडच्या तुंगा रुग्णालयात घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांसह लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केल्यानंतर सकाळी पावणेनऊच्या सुमारास मृतदेह ताब्यात देण्यात आला.मीरा रोडला राहणाºया ५८ वर्षीय मंजू बलसारा यांना अस्वस्थ वाटत असल्याने १४ फेब्रुवारीला तुंगा रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते. त्यांचा मुलगा केतन यांनी सांगितले की, माझी आई रुग्णालयात चालत गेली होती. तिचा ३ लाखांपर्यंत मेडिक्लेम होता. ती चार दिवस आयसीयूत होती. तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. सोमवारी शस्त्रक्रिया केली. ती यशस्वी झाली. तोच बुधवारी पहाटे रुग्णालयाने आईचे हृदयविकाराने निधन झाल्याचे सांगितले. आम्ही मृतदेहाचा ताबा मागितला, पण २ लाख ४१ हजार रुपये बिल झाले असून तुमच्या मेडिक्लेमच्या मंजुरीची कार्यवाही पूर्ण झालेली नसल्याने मृतदेह ताब्यात देता येणार नाही. रोखरक्कम भरा तरच मृतदेहाचा ताबा मिळेल, असे सांगितले. तेथे लोकप्रतिनिधी पोचले. त्यांनी रूग्णालयाला ठणकावल्याने तब्बल पाच तासानंतर म्हणजे सकाळी पावणेनऊच्या सुमारास रुग्णालयाने मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिला.
बिल न दिल्याने मृतदेह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:58 AM