अंबरनाथ - दक्षिण मुंबईतील नागपाडा चर्चमध्ये गेल्या 9 दिवसांपासून प्रार्थना करुन मृत तरुणाला जिवंत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील चिंचपोकळी परिसरात राहणारा मिशाख नेव्हीस या तरुणाचा कर्करोगाने 27 ऑक्टोबरला मृत्यू झाला होता. त्याचे वडील नागपाडा येथील जीजस फॉर ऑल नेशनस् चर्चचे बिशप आहेत. प्रार्थना केल्यावर आपला मुलगा जिवंत होईल, या आशेवर नेव्हीस कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह चर्चमध्ये आणला. पोलिसांनी या कुटुंबीयांना मिशाखच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी पोलिसांचे म्हणणे ऐकले नाही.
आपल्या तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने वडिलांनी त्याला पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न सुरू केला. नागपाडा येथील चर्चमध्ये मिशाख याला 27 ऑक्टोबरला ठेवण्यात आले. चर्चमध्ये प्रार्थना केल्यावर जिजस त्याच्यामध्ये पुन्हा प्राण टाकेल, असे त्यांना वाटत होते. 9 दिवस चर्चमध्ये ठेवल्यावर त्याची चर्चा नागपाडा भागात झाल्यावर पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. या तरुणाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. मात्र मिशाखच्या कुटुंबीयांनी प्रार्थना सुरूच ठेवण्याचा निर्णय घेला. नागपाडा येथे चर्चा झाल्याने त्यांनी हा मृतदेह थेट अंबरनाथ येथील जीजस फॉर ऑल नेशन्स चर्चमध्ये आणले.
5 नोव्हेंबरला पहाटे 5 वाजता पुन्हा अंबरनाथच्या चर्चेमध्ये प्रार्थना सुरु करण्यात आली. दिवसभर या तरुणाला जिवंत करण्याचे प्रयत्न बिशप यांनी केले. त्यांच्यासोबत त्या मुलाचे कुटुंबीय देखील होते. रात्री उशिरा या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच अंबरनाथ पोलिसांनीही यात हस्तक्षेप केला व मिशाखच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. मिशाख या तरुणाला अंबरनाथच्या चर्चेमध्ये आणल्याची माहिती नागपाडा पोलिसांनादेखील देण्यात आली आहे. त्यामुळे या तरुणाच्या बाबतीत त्याचे कुटुंबीय काय निर्णय घेतात हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र अंबरनाथहून हा मिशाखचा मृतदेह चिंचपोकळी येथे त्याच्या राहत्या घरी नेण्यात आला आहे.
मिशाख या तरुणाला अंबरनाथच्या ज्या चर्चमध्ये आणण्यात आले होते ते चर्च अंबरनाथच्या नारायण चित्रपटगृहात सुरु करण्यात आले आहे. या प्रकारामुळे आता चर्चच्या अडचणीत वाढ झालेली असुन अंधश्रद्धा प्रकरणात चर्चवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. पोलीस या प्रकरणात नागपाडा पोलीसांसोबत चर्चा करुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करित आहेत.