ठाणे : कौटुंबिक कलहातून ठाण्यातील उथळसर भागातील जीवन ओहाळ (३०) या तरुणाने उथळसर नाल्यात रविवारी पहाटेच्या सुमारास उडी घेतली होती. त्याचा मृतदेह गुरुवारी पाच दिवसांनी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या हाती लागला.
मुसळधार पावसामुळे उथळसर नाल्याचाही प्रवाह वाढलेला असतानाच १८ जुलै रोजी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास डॉ. आंबेडकर रोड येथील मीनाताई ठाकरे चौक, उथळसर नाल्यात त्याने वडिलांबरोबर झालेल्या भांडणातील रागाच्या भरात उडी घेतली. ही माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे अग्निशमन दल आणि आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल (टीडीआरएफ) यांनी भर पावसात त्याला शोधण्यासाठी पहाटे मोहीम राबविली. परंतु, नाल्यातील पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे त्याचा शोध लागू शकला नव्हता. डॉ. आंबेडकर रोड जवळील नाला ते साकेतखाडी परिसरामध्ये हे शोधकार्य केले. पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे अखेर १८ तासांनी ही शोध मोहीम थांबविली होती. दरम्यान, २२ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कळवा, विटावा येथील गणेश विसर्जन घाटाजवळील खाडीमध्ये जीवनचा मृतदेह टीडीआारएफच्या पथकाला मिळाला. तो उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.