अंबरनाथ : जमिनीवरुन लांब पल्यावरील शत्रूवर हल्ला करण्यासाठी आत्तापर्यंत प्रभावी तोफ म्हणून बोफोर्सचा वापर केला जात होता. बोफोर्स ही परदेशातून आयात करावी लागत होती. मात्र आता या तोफेपेक्षा जास्त क्षमतेची आधुनिक अशा धनुष तोफेची निर्मिती भारतात केली जात आहे, अशी माहिती आयुध निर्माण बोर्डाचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक वेदप्रकाश यजुर्वेदी यांनी दिली. अंबरनाथमधील आयुध निर्माण कारखान्याला मंगळवारी त्यांनी भेट दिली. भारतात शस्त्र निर्मिती करणारे ४१ आयुध निर्माणी कारखाने आहेत. या कारखान्यांची जबाबदारीही आयुध निर्माणी बोर्डाकडे असून त्यांच्या निर्देशानुसार देशात शस्त्र निर्मिती केली जाते. या बोर्डाचे अध्यक्ष यजुर्वेदी हे अंबरनाथमध्ये आयुध निर्माणी कारखान्यात आले होते. यावेळी माहिती देताना त्यांनी भारतात निर्मिती होणाऱ्या आधुनिक तोफेच्या निर्मितीची माहिती दिली. कारगिल युद्धात चमकदार कामगिरी केलेल्या बोफोर्स तोफांना पर्यायी तोफेची निर्मिती केली जात असून धनुष असे या तोफेला नाव देण्यात आले आहे. जबलपूर येथील जी.सी.एफमध्ये त्याच्या निर्मितीचे काम सुरु आहे. या तोफेसाठी लागणाऱ्या तोफ गोळ्यांची निर्मितीही सुरु करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील संचलनात धनुष तोफेचा समावेश करण्यात आला आहे असेही ते म्हणाले. संरक्षण विभागात मेक इन इंडिया अंतर्गत ही पहिली निर्मिती करण्यात आली आहे. देशातील तंत्रज्ञान विकसित करुन ही तोफ तयार करण्यात आली आहे. तसेच या तोफेची क्षमता बोफोर्सपेक्षाही जास्त राहणार आहे. साधारणत: ३८ किमीपर्यंत मारा करण्याची क्षमता या तोफेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतात निर्मिती होणाऱ्या पॅराशूटला लहान देशातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पॅराशूटची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशातील सर्व आयुध निर्माण कारखान्यांच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु असून अनेक कारखान्यांमध्ये रोबोटचा वापर करुन काम केले जात आहे. (प्रतिनिधी)
बोफोर्सला मिळाला पर्याय
By admin | Published: January 05, 2017 5:27 AM