मुंब्रा : बोगस कॉल सेंटर चालवून त्याच्या माध्यमातून अमेरिकेन नागरिकांची तसेच शासनाची फसवणूक केलेल्या अब्दुल चौधरी याला मुंब्रा पोलिसांनी अटक करून सेंटर चालवण्यासाठी तो वापरत असलेली सामग्री हस्तगत केली आहे.
येथील आजादनगर परिसरातील या बोगस कॉल सेंटरमधून फोन करून आरोपी अब्दुल चौधरी हा अमेरिकन नागरिकांना मेडिकल कंपनीकडून मोफत मेडिकल बेल्ट मिळत असल्याचे आमिष दाखवून त्यांना बेल्ट घेण्यासाठी प्रवृत्त करत होता. त्याने आतापर्यंत किती जणांची फसवणूक करून शासनाचा किती रुपयांचा महसूल बुडवला, याचा तपास सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक गिरीश गायकवाड यांनी लोकमतला दिली.
आरोपीकडून २५ हजार रुपये किमतीचे पाच मॉनिटर, ७५ हजारांचे पाच सीपीयू, दोन हजार ५०० रुपये किमतीचे पाच की-बोर्ड, एक हजार रूपयांचे पाच माउस, पाच हजार रुपये किमतीचे पाच हेडफोन तसेच एक हजार रुपयांचा राउटर आणि चार हजार रुपये किमतीचे दोन कनेक्टर अशी एकूण एक लाख १३ हजार ५०० रुपयांची सामग्री पोलिसांनी ताब्यात घेतली.