राजू ओढे ठाणे : ठाणे पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील आरोपींनी चक्क अमेरिकन बँकेचे बनावट धनादेश तयार केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या आरोपींचे अमेरिकेत काही साथीदार असून, तेदेखील या गुन्ह्यात सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले.घोडबंदर रोडवरील आनंदनगरातील उन्नती वूड्स सोसायटीमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर कासारवडवली पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री धाड टाकली. गुजरातमधील बडोदा येथील राकेश अनिल कोंडवाणी आणि राजस्थानमधील बिलियावास येथील जोरावत शेरसिंग राजपूत यांना पोलिसांनी अटक केली. व्हीओआयपी कॉलद्वारे हे आरोपी अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून त्यांना कर्जाचे आमिष दाखवायचे. त्यानंतर प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली त्यांची फसवणूक करायचे.अमेरिकन नागरिकांची फसवणूक करताना त्यांचा विश्वास बसावा, यासाठी आरोपी काही ठरलेल्या युक्त्या वापरायचे. कर्जमंजुरीसाठी खात्याची पडताळणी करायची असल्याचे सांगून ते अमेरिकन नागरिकाचा बँक खाते क्रमांक मिळवायचे. या खात्यामध्ये काही डॉलर्सचा धनादेश जमा करणार असल्याचे सांगून, अमेरिकन बँकेच्या बनावट धनादेशाची प्रत ते पीडित नागरिकास ई-मेलद्वारे पाठवायचे. या कामासाठी त्यांना अमेरिकेतील त्यांच्या साथीदार आरोपींकडून वेळोवेळी मदत होत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंगळवारी सुनावली आहे.आरोपींचे अहमदाबाद कनेक्शनआॅक्टोबर २०१६ मध्ये ठाणे पोलिसांनी मीरा रोडवरील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. या कारवाईनंतर गुजरात पोलिसांनी अहमदाबादमध्ये कारवाई करून तेथे बोगस कॉल सेंटर चालवणाºयांना अटक केली. या कारवाईमुळे बंद पडलेल्या बोगस कॉल सेंटरमधील आरोपींनी आता वेगवेगळ्या शहरांत हा गोरखधंदा सुरू केला. कासारवडवली पोलिसांनी अटक केलेला राकेश अनिल कोंडवाणी हा गुजरातचा रहिवासी असून तो यापूर्वी अहमदाबाद येथील एका कॉल सेंटरमध्ये कामाला होता, असे तपासात समोर आले आहे.
बोगस कॉल सेंटर प्रकरण : आरोपींनी बनविले बँकेचे बनावट धनादेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 3:35 AM