ठाणे : शहरातील बोगस डॉक्टरांना चाप बसवण्यासाठी आणि कशाही पद्धतीने रक्तचाचण्या करून काही वेळेस चुकीचे रिपोर्ट देणाऱ्या पॅथलॅबवर अंकुश आणण्यासाठी आता पालिकेने चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. खाजगी दवाखाने असले तरी तिथे सेवा देणाऱ्या डॉक्टरांची डिग्री अधिकृत आहे की नाही, याची कोणतीही माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसते. त्यामुळे अशा डॉक्टरांना आता प्रत्येक तीन वर्षांनी आपली पुनर्नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. शिवाय, असंख्य पॅथालॉजी लॅबमध्येही अपुरे ज्ञान असलेले प्रयोगशाळा तंत्रज्ञ रिपोर्ट तयार करत असतात. या सर्व गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आता रुग्णालयांच्या धर्तीवर खासगी डॉक्टर आणि पॅथालॉजी लॅबची नोंदणीही सक्तीची केली जाणार आहे. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव येत्या २० एप्रिल रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. शहरात कोण आणि कसा व्यवसाय करतो, याचा थांगपत्ताच सरकारी यंत्रणांना नाही. त्यामुळे त्यांची नोंदणी करण्याचा सरकार निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला होता. काही महापालिकांनी त्याच्या अंमलबजावणीस सुरु वात केली असली तरी ठाण्यात मात्र अद्याप त्याबाबतच्या हालचाली झाल्या नव्हत्या. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशानुसार सरकारी निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात झोपडपट्टी भागात अनेक ठिकाणी, बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. तसेच अनेक भागांत खाजगी पॅथलॅब सुरू असून त्यांच्याकडून रुग्णांची फसवणूक सुरू आहे. परंतु, आता यावर अंकुश बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरने आपले नाव, वैद्यक परिषदेकडील नोंदणी क्र मांक, व्यवसायाचा पत्ता, मोबाइल क्र मांक, ई-मेल पत्ता आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रती अशी माहिती पालिकेकडे देणे बंधनकारक केले जाणार आहे. त्या नोंदणीसाठी नाममात्र शुल्कही आकारले जाणार आहे. ही नोंदणी झाल्यानंतर त्यांची माहिती पालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे अधिकृत आणि बोगस डॉक्टर कोण, हे ओळखणे सोयीचे होणार असून बोगस डॉक्टरांच्या विरोधातील फास आवळणेही त्यामुळे शक्य होणार आहे. त्यानुसार, अशा डॉक्टरांना प्रत्येक तीन वर्षांनी आपली पुनर्नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. परंतु, त्यांनी निर्धारित कालावधीत पुनर्नोेंदणी केली नाही, तर मात्र त्यांना विलंब शुल्क म्हणून रोज ५० रुपये याप्रमाणे विलंब शुल्क आकारले जाणार आहे. दरम्यान, त्यानुसार अ वर्गातील कन्सल्टिंगसाठी वार्षिक १५ हजार, ब वर्गासाठी १० हजार, क वर्ग ५ हजार, ड वर्ग ३ हजार इ वर्ग २ हजार एफ वर्ग १५०० आणि जी वर्गासाठी १ हजार रुपये आकारले जाणार आहेत. बोगस वैद्यकीय व्यावसाय करणारे ओळखता यावेत आणि कोणत्या आजाराचे विशेषज्ञ शहराच्या कोणत्या भागात काम करतात, याची माहिती संकलित व्हावी, हा या निर्णयामागचा उद्देश असल्याचे आरोग्य अधिकारी आर.टी. केंद्रे यांनी सांगितले. त्याशिवाय, अशा दवाखान्यांमध्ये किंवा पॅथॉलॉजी लॅबमध्ये जमा होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जात नाही. (प्रतिनिधी)वार्षिक शुल्कनिश्चितीज्या नोंदणीकृत पॅथॉलॉजी लॅब असतील आणि ज्यांच्याकडे प्रतिदिन १०० नमुने जमा होत असतील, त्यांना वार्षिक ३ हजार नोंदणी शुल्क भरावे लागेल. तर, १०१ ते १ हजार नमुने जमा होणाऱ्यांकडून ५ हजार, १००१ ते ५ हजार नमुने जमा करणाऱ्यांकडे १० हजार आणि ५००१ च्या पुढे असणाऱ्या लॅबला २५ हजार वार्षिक नोंदणी शुल्क असेल.
शहरातील बोगस डॉक्टर, पॅथलॅबला बसणार चाप
By admin | Published: April 14, 2017 3:24 AM