लोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : मुरबाड तालुक्यातील गोरगरीब, आदिवासींच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार मुरबाड, सरळगाव, म्हसा येथे पॅथॉलॉजी लॅब थाटून सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या बोगस लॅबना आळा घालावा, अशी मागणी मनसेने तालुका आरोग्य अधिकारी सुनील बनसोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.मुरबाड शहरासह तालुक्यातील नाक्यानाक्यांवर पॅथॉलॉजी लॅब थाटल्या असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गैर व अनागोंदी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. या पॅथॉलॉजी लॅबमध्ये एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पदव्युत्तर पॅथॉलॉजीचे शिक्षण घेतलेल्या तज्ज्ञ डॉक्टरने स्वत: लॅबमध्ये रुग्णांच्या रक्तचाचण्या करणे बंधनकारक असताना मुरबाडमध्ये मात्र लॅब एकाच्या नावावर आणि चालवणारा भलताच अशी परिस्थिती आहे.तज्ज्ञ डॉक्टर आरोग्यचाचण्या न करता कोणताही अनुभव नसलेली व्यक्ती निरोगीला रोगी असल्याचा अहवाल देत आहे, तर रुग्णाला निरोगी असल्याचा अहवाल दिला जातो. चुकीच्या निदानामुळे रु ग्णाच्या आरोग्याशी या लॅबचालकांनी खेळ मांडला आहे. चाचणीसाठीचे दर निश्चित नसल्याने आरोग्यासोबतच आर्थिक लूटमार अनेक वर्षांपासून मुरबाड तालुक्यात सुरू असल्याचा गंभीर प्रकार मनसेने बनसोडे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.हा प्रकार गंभीर असून रुग्णांच्या आरोग्याशी खेळ मांडला असल्याने याची चौकशी करून कारवाई करावी.- नरेश देसले, शहराध्यक्ष, मनसेमुरबाड तालुक्यात पॅथॉलॉजी लॅब आहेत. त्यांच्यासाठी काही नियमावली आहे. डीएमएलटी अभ्यासक्रम केलेले असतील, तेच लॅब चालवू शकतात. मनसेची तक्र ार आली आहे. याबाबत चौकशी केली जाईल. - सुनील बनसोडे, तालुका आरोग्य अधिकारी
मुरबाड तालुक्यात बोगस पॅथॉलॉजी लॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:10 AM