ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांच्या पदव्यांवर कोर्टानेच संशय व्यक्त केला आहे. असे असतानाही त्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याऐवजी त्यांना वनखात्याच्या शिफारशीवरून पुन्हा सदस्यपद बहाल करण्यात येत आहे. बोगस पदवी धारण करणाऱ्या या दोघांची चौकशी केल्याशिवाय समिती जाहीर करण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.ठामपाच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यपदासाठी माजी नगरसेविका नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांच्या नावांची शिफारस केली आहे. मात्र, या दोघांच्या शैक्षणिकपात्रतेसंदर्भात मोठा संभ्रम आहे. या दोघांनी हिमालयीन युनिव्हर्सिटी, इटानगर, अरुणाचल प्रदेश येथील पदवी सादर केली आहे. विशेष म्हणजे एकाच वर्षात या दोघांनी पदवी घेतली आहे. तावडे यांनी मे २०१७ मध्ये बॅचलर आॅफ सायन्सची, तर भोसले यांनी डिसेंबर २०१७ मध्ये डिप्लोमा आॅफ अॅग्रीकल्चर अशी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे दाखवले आहे. त्यांच्या या शैक्षणिकपात्रतेवर संशय व्यक्त केलेला असतानाही पुन्हा त्यांचीच या समितीवर वर्णी लावण्यात येत आहे. वास्तविक, कोर्टाने संशय व्यक्त केलेला असतानाच चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची गरज होती. मात्र, तसे न करता सदस्यपद बहाल करण्यामागे काळेबेरे असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे या दोघांनीही ज्या विद्यापीठातून पदवी घेतली आहे, त्या विद्यापीठाचे कुलगुरू-प्राचार्य यांचे प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. त्यांनी वर्गात हजेरी लावली होती का, हजेरीपटावरील त्यांची उपस्थिती आणि शिक्षण घेत असताना ते कुठे राहिले होते, याचा शोध घ्यावा. त्यानंतरच समिती गठीत करावी, अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.
डिप्लोमा आॅफ अॅग्रीकल्चर हा पदविका कोर्स मी हिमालयीन युनिव्हर्सिटीतून केला असून, त्याची रितसर परीक्षा दिलेली आहे. डिसेंबर २0१७ मध्ये मी अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाली. त्याची सर्व कागदपत्रे मी सादर केलीत. माझ्या पदविकेवर न्यायालयानेही कधीच संशय व्यक्त केला नाही. माझ्या शैक्षणिक अर्हतेविषयी सर्व कागदपत्रे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. आमदार आव्हाड करीत असलेले आरोप हे राजकीय हेतूने प्रेरीत आहेत. कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. - नम्रता भोसले (जाधव)