भिवंडी : महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर प्रशासनाकडून अन्याय होत असून त्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसंदर्भात अनेकवेळ आंदोलन करूनही दाद न मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेचे भिवंडी शहराध्यक्ष संतोष साळवी यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयात समोर बुधवारी कामगारांनी बोंब मारो आंदोलन करून निषेध नोंदवला. यावेळी संतोष साळवी यांनी कामगारांच्या प्रश्नाबाबत बोलताना सांगितले की, तत्कालीन आयुक्तांकडे कामगारांचे विविध प्रश्न, समस्या मांडल्या आहेत. पण, आजपर्यंत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.
सातवा वेतन आयोगाचा फरक जानेवारी २०१६ पासून मिळावा, नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती योजने मध्ये १ एप्रिल २०१९ पासून महापालिकेचा वाढीव चार टक्के हिस्सा तात्काळ कामगारांच्या अंशदान निवृत्ती वेतनात वर्ग करावा,नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेचे तात्काळ खाते उघडून कामगारांना पासबुक उपलब्ध करून द्यावे,नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन अंतर्गत किती कर्मचारी यांची एलआयसी सुरू आहे व किती कर्मचाऱ्यांची एलआयसी बंद झाली आहे. त्याची यादी तात्काळ कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी, मनपा प्रशासनाच्या चुकीमुळे बंद पडलेली एलआयसी पॉलिसीचा दंड, व्याज महानगरपालिकेने स्वतः भरून कामगारांची पॉलिसी पूर्णपणे सुरू करावी, सर्व एलआयसी धारक कामगारांना तात्काळ एलआयसीचे प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व सफाई कामगारांना चांगल्या दर्जाचे गमबूट व रेनकोट उपलब्ध करून द्यावेत या व इतर मागण्यांसंदर्भातील निवेदन देऊन त्यावर चर्चा करावी अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या. मनसेच्या या बोंबा मारो आंदोलनाप्रसंगी मनसेचे मदन अण्णा पाटील, बालाजी गुळवी, शैलेश करले,सचिन पाटील,श्याम गायकवाड,सुधीर भोईर, रवी गायकवाड या शिष्टमंडळाने उपायुक्त दीपक पुजारी यांच्या सोबत चर्चा केली असता सर्व मागण्यांवर प्रशासनाकडून झालेल्या कारवाईबाबत येत्या सात दिवसात लेखी उत्तर देण्याचे आश्वासन उपायुक्त दीपक पुजारी यांनी दिल्याची माहिती संतोष साळवी यांनी दिली आहे.