लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील ‘नाद’ या बंगल्यावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा निनावी फोन ठाणे नियंत्रण कक्षाला शनिवारी रात्री आला होता. याची गांभीर्याने दखल घेत ठाणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक नाशक पथकाने (बीडीडीएस) केलेल्या तपासणीनंतर ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यामध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आहे, अशी माहिती देणारा एक निनावी फोन ठाणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ३ फेब्रुवारी राेजी (शनिवारी) रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आला. ही माहिती मिळताच ठाणेनगर पोलिसांनी तातडीने याची माहिती वर्तकनगर पोलिस तसेच बीडीडीएस पकाला दिली. त्यानुसार वर्तकनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाधचवरे आणि बीडीडीएसचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम सोनवणे यांच्यासह स्रीफर श्वान टायगर याने तळ अधिक दोन मजली नाद बंगल्याची रात्री १२.३० ते रविवारी पहाटे २ वाजेपर्यंत कसून तपासणी केली.
अखेर या बंगल्यात कुठेही बॉम्ब किंवा स्फोटके नसल्याचा निर्वाळा श्वान टायगरने दिल्यानंतर पोलिसांसह आमदार आव्हाड यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, याप्रकरणी वर्तकनगर पोलिस अधिक तपास करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.