पंकज रोडेकर / ठाणेनिवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून ठाणे पोलिसांनी स्थानिक पातळीवर ‘गुंडाराज’ माजवणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई तर केलीच, पण शांततेची हमी देणारी प्रतिज्ञापत्रेही लिहून घेतली आहेत. ठाणे आणि उल्हासनगर या महापालिका हद्दीतील १२०० कुख्यात गुंड व गुन्हेगारांकडून असे बॉण्ड लिहून घेतले असून ते कोट्यवधींचे आहेत. यात निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणाऱ्या सातआठ उमेदवारांचाही समावेश असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. पूर्वी हजारो रुपयांचा असणारा बॉण्ड आता करोडोंच्या घरात गेला आहे.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ठाणे आणि उल्हासनगर या दोन्ही महापालिकांत निवडणूक होत आहे. तेथे शांतता राखण्यासाठी शहर पोलिसांनी कंबर कसली आहे. आचारसंहिता लागू होताच पोलिसांनी स्थानिक गुंडाराज चालवणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले. दोन्ही महापालिकांतील १२०० पेक्षा अधिक जणांवर दोन प्रकारे कारवाई केली. यात तडीपारीचे प्रस्ताव तयार करताना शांतता राखण्याची हमीपत्रेही लिहून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन्ही महापालिका हद्दीतील ३४ जणांना पाच जिल्ह्यांमधून तडीपार केले. १२०० पेक्षा अधिक जणांकडून प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली. त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन रक्कम पोलिसांनी वाढवली आहे. पूर्वी हा बॉण्ड सर्वाधिक १५ हजार रुपयांपर्यंत घेतला जात होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या प्रतिज्ञापत्रासह लाखो तसेच कोट्यवधींचा बॉण्ड घेतला जाऊ लागल्याचे सूत्रांनी सांगितले.सॉफ्टवेअरमुळे कोंडी स्थानिक गुंड किंवा नामचीन मंडळीची कुंडली आता पोलिसांच्या चारित्र्य सॉफ्टवेअरवर अपडेट असल्याने कोणावर किती गुन्हे आहेत, हे लपवता येत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींची कोंडी झाली आहे. या सॉफ्टवेअरने पोलिसांचे कामही सोपे झाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
निवडणुकीसाठी १२०० जणांकडून बॉण्ड
By admin | Published: February 20, 2017 5:59 AM