कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या महासभेत महापालिका कर्मचा-यांना 12 हजार बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र 12 हजार रुपयांची रक्कम कर्मचा-यांना मान्य नाही. मागच्या वर्षी इतकीचा 14 हजार 500 रुपये बोनस मिळावा या मागणीवर कामगार ठाम असून आज याच मागणीसाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने प्रवेशद्वार सभा घेण्यात आली.
यासभेला कामगार सेनेचे प्रकाश पेणकर यांनी संबोधित केले. यावेळी प्रवेशद्वाराजवळ कामगारांनी एकच गर्दी केली होती. महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. महापालिकेचे सर्व कराच्या वसूलीतून 840 कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. उत्पन्न 840 कोटी अपेक्षीत असताना 1140 कोटी रुपयांची विकास कामे महापालिकेने हाती घेतली आहे. त्यात 60 कोटी रुपये कंत्रटदारांची बिला द्यायची आहे. महापालिकेच्या बजेटमध्ये 300 कोटी रुपयांची तूट आहे. ही तूट भरुन काढण्यासाठी सरकारकडे निधी अथवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र बांधिल खर्च करावाच लागणार आहे असे आयुक्त पी. वेलरासू यांनी महासभेत स्पष्ट केले होते. महासभेत आयुक्तांनी कर्मचारी पगार व बोनस रोखला जाणार नाही असेही स्पष्ट केले होते. आर्थिक परिस्थिती बिटक असल्याने यंदा 12 हजार रुपयांचा बोनस जाहिर करण्यात आला. हा बोनस दोन टप्प्यात देण्याचे सांगण्यात आले. महापालिकेने मागच्या वर्षी 14 हजार 500 रुपये बोनस दिला होता. यंदाच्या वर्षी अडीच हजार रुपये कमी बोनस दिला जात आहे. मागच्या वर्षी इतकाच बोनस दिला जावा या मागणीवर कामगार व संघटना ठाम आहेत. बोनस जास्त देता येणार नाही हे जरी कामगारांना पटत असले तरी तो कमी करण्यात येऊ नये. तसेच दोन टप्प्यात न देता एकाच टप्प्यात दिला जावा या मागणीकडे पेणकर यांनी लक्ष वेधले आहे. पेणकर यांनी 14 हजार 500 रुपयांच्या बोनसच्या मागणीचे पत्र महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याकडे दिले आहे. आयुक्त प्रशासकीय प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याने हा विषय आयुक्तांशी चर्चा करुन काय ते ठरविले जाईल असे आश्वासन देवळेकर यांनी दिले आहे. दिवाळी 17 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी कामगारांच्या हाती बोनसची रक्कम मिळावी अशी आपेक्षा कामगारांस संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. किमान 14 ऑक्टोबरला बोनसची रक्कम कामगारांना मिळाल्यास दोन दिवस तरी कामगारांना दिवाळीची खरेदी करता येणार आहे. याकडे पेणकर यांनी लक्ष वेधले आहे.