लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : गणेशोत्सवाला सामाजिक जोड देऊन दरवर्षी अनोखा उत्सव झेप प्रतिष्ठान साजरा करीत असते. बाप्पा पुढे ठेवा एक व्ही अन पेन असे आवाहन यंदाही झेप प्रतिष्ठानने केले आहे. मात्र यंदा केवळ आदिवासी पाड्यातील आणि शहरातील गरजू विद्यार्थी नव्हे तर पूरग्रस्त विद्यार्थ्यांना देखील उत्सवादरम्यान संकलित झालेली शैक्षणिक मदत दिली जाणार आहे. पूरग्रस्त भागांतील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करीत झेप प्रतिष्ठानने यंदा देखील हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी पूर्वतयारी म्हणून संस्थेचे पदाधिकारी ज्या भागांत शैक्षणिक मदतीची गरज आहे अशा ठिकाणांचे सर्व्हेक्षण करत आहे. जेणेकरून ही मदत योग्य विद्यार्थ्यांच्या हातात जावी यामागचा हा हेतू आहे.
झेप प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सवात एक वही एक पेन उपक्रम राबवण्यात येणार असून हे या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये झेप प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व बाप्पाच्या भाविकांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला होता. त्याचमुळे जवळपास एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत झाली होती आणि ही मदत आदिवासी पाड्यातील मुलांना पोहचवण्यात आलेली होती.
गणेशोत्सवात घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील गणेशभक्तांना झेप प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी एक वही एक पेन देण्याचे आवाहन करण्यात येते ज्या अंतर्गत भाविक दर्शनाला येताना या वस्तू गणेशाला अर्पण करतात आणि ही मदत झेप प्रतिष्ठानचे सहकारी घरी किंवा मंडळांना भेट देऊन जमा करतात. तसेच ही मदत शैक्षणिक वर्षात मुलांना दिली जाते ज्याचा काटकसरीने वापर करून मुल या वस्तूंचा वापर करतात. विद्येची देवता असलेल्या गणेशाची यापेक्षा सुंदर अशी आराधना होऊच शकत नाही असे मत झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास धनवडे यांनी व्यक्त केले. बाप्पाच्या दर्शनाला येताना प्रसादाबरोबर वही आणि पेन आणण्याचे आवाहन धनवडे यांनी केले आहे.