देशाचे आरोग्य चांगले असेल तर तेथील माणसांचेही चांगले असते. हे आरोग्य दर्जेदार राहण्यासाठी तेवढ्याच तोडीचे डॉक्टर असणे गरजेचे आहे. भविष्यात कमी गुणवत्ता असलेल्या डॉक्टरांच्या हाती देशाचे आरोग्य गेल्यास निश्चितच ते धोकादायक आहे. पण दुर्दैवाने पुढील काही वर्षांत असे चित्र उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज आपल्या देशात शिक्षण महाग होत चालले आहे. यात वैद्यकीय शिक्षणाचाही सहभाग आहे. त्यातच प्रत्येकवर्षी नियम बदलले जात असल्याने कायम गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असते. यात विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने पालक आपल्या मुलाला एमबीबीएसच्या शिक्षणासाठी सरळ परदेशात पाठवण्यास तयार होतात. मुळात आपल्याकडील वैद्यकीय शिक्षणाच्या खर्चापेक्षा परदेशातील महाविद्यालयातून देण्यात येणारे शिक्षण कमी खर्चात होत असल्याने तेथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल वाढत चालला आहे. पण हे विद्यार्थी एमबीबीएस होऊन जेव्हा भारतात परततात, तेव्हा येथे प्रॅक्टीस सुरू करण्यासाठी फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट ही परीक्षा द्यावी लागते. त्यात उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला वैद्यकीय व्यवसाय सुरू करता येतो. पण ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण हे १५ टक्क्यांच्या आसपास असल्याचे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.जर विद्यार्थी परदेशातून शिकून येतो, याचा अर्थ तो हुशार असा आपला समज असतो. मग तो अनुत्तीर्ण का होतो, तर मुळात परदेशात दिले जाणारे वैद्यकीय शिक्षण हे पुस्तकी आहे, त्याउलट भारतात मिळणारे शिक्षण पुस्तकीबरोबरच प्रॅक्टीकल अधिक आहे. आपल्या देशात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करताना त्यांना ज्ञानाचा अनुभव मिळतो. आपल्याकडील एमबीबीएस झालेला डॉक्टर जेवढ्या पटकन रुग्णाचे निदान करू शकतो, त्या तुलनेत परदेशातून शिकून आलेले डॉक्टर करू शकत नाही. मुळात परदेशात तेथील आरोग्यव्यवस्थेनुसार शिक्षण दिले जाते. त्यामुळे तेथून शिकून आलेला विद्यार्थी आपल्या देशातील शिक्षणव्यवस्थेनुसार योग्य आहे की नाही, यासाठी ही परीक्षा घेतली जाते आणि ती घेणे १०० टक्के आवश्यक आहे. ही परीक्षा प्रॅक्टीकलवर आधारित असल्याने परदेशातून शिक्षण घेऊन येणाºयांना ती सोडवणे जरा जड जाते. कारण परदेशातील शिक्षण हे पुस्तकी आहे.
बांगलादेश, नेपाळ, मॉरिशसमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन आलेले व ही परीक्षा देणारे विद्यार्थी उत्तीर्ण होणाºयांचे प्रमाण अन्य देशातून शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक आहे. हे सर्व देश भारताजवळील असल्याने तेथेही आपल्याप्रमाणे प्रॅक्टीकलवर अधिक भर दिला जातो. फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षा ही प्रॅक्टीकलवर आधारित असल्याने या तीन देशांतून शिक्षण घेऊन आलेले विद्यार्थी उत्तीर्ण होतात. अशा प्रकारची परीक्षा ही केवळ भारतातच घेतली जात नाहीतर प्रत्येक देशात घेतली जाते. आज आपल्या देशात दुर्दैवाने कुठल्याही क्षेत्रातील धोरण ठरविताना त्यातील तज्ज्ञांना सामावून घेत नसल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जरी त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी काही सूचना केल्या, सल्ले दिले तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जर तज्ज्ञांच्या सूचनांनुसार अंमलबजावणी केल्यास व्यवस्थेत निर्माण होणारा गोंधळ, तरी किमान दूर होईल. पण ऐकायचेच नाही, अशी भूमिका घेतली तर करायचे काय? संबंधित विषयातील माहिती नसताना अधिकारी जर धोरण ठरविणार असतील तर देशाचे पुढे काय होईल, हे काही सांगता येत नाही. चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठवण्यासाठी नागरिकांच्या दबावाची गरज आहे, दुर्दैवाने ती आपल्याकडे दिसून येत नाही.
(लेखक हॉस्पिटल बोर्ड आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत.)गरीब विद्यार्थी डॉक्टर होणे अशक्य : दोन ते तीन वर्षांत खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढणार आहे. तेथील फी ही प्रचंड असल्याने तुमचा मुलगा हुशार असूनही केवळ पैसे नसल्यामुळे त्याला डॉक्टर होता येणार नाही. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, अशांची मुले डॉक्टर होताना दिसतील. प्रामाणिक डॉक्टरलाही त्याच्या मुलाला डॉक्टर बनवणे कठीण होणार आहे. यामुळे गुणवत्ता असलेले डॉक्टर देशामध्ये भविष्यात किती असू शकतील, हे सांगणे अवघड आहे. जर एखाद्या डॉक्टरला आपल्या मुलाला डॉक्टर करायचे असेल तर तो रूग्णाच्या खिशात हात घालणारच. या कारणामुळेच आज सेवेपेक्षा डॉक्टरी पेशा हा व्यवसाय झाला आहे.