भिवंडी : ‘देशातील वाढती लोकसंख्या हा देशांवर भार नसून त्या लोकांचा कौशल्यपूर्ण विकास केला तर जागतिक पातळीवर तो देशाला वरदान ठरणार आहे.’अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यातील वेहळे गावातील लोढा कॉम्प्लेक्समधील कौशल्य विकास केंद्राच्या उद््घाटनप्रसंगी केलेल्या भाषणांतून दिली.मुंबई-नाशिक महामार्गावरील वेहळे गावात लोढा कॉम्प्लेक्सच्या परिसरांत गोळवलकर गुरूजी कौशल्य विकास केंद्राचे उद््घाटन व गुरूजींच्या मूर्तीचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भैय्याजी जोशी यांच्या हस्ते आज सायंकाळी साडेसहा वाजता संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, लोकसंख्येला समस्या न मानता तिला संपत्ती मानले पाहिजे. त्यासाठी तिला प्रशिक्षित केले पाहिजे. त्यातून तिचा आणि देशाचा विकास होईल. या प्रसंगी खासदार कपील पाटील, बिरला कॉलेजचे प्राचार्य डॉ.नरेश चंद्र, विद्यानिकेतनचे प्राचार्य विवेक पंडीत व कार्यक्रमाचे आयोजक आमदार मंगलप्रसाद लोढा यांची भाषणे झाली.कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी आपल्या भाषणांत सांगीतले की,‘ ग्रामीण भागातील शिक्षणाची अत्यंत दुरावस्था आहे. कुठे शाळा आहेत तर शिक्षक नाहीत. तर कुठे शिक्षक आहेत तर शाळा नाहीत. तर कुठे विद्यार्थी नाहीत. हे चित्र बदलले पाहिजे. शिक्षणाबरोबर मनुष्य घडला पाहिजे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘स्किल डेव्हलपमेंट’मध्ये कुटीरोद्योगाचा समावेश केला पाहिजे, अशी सुचना त्यांनी या वेळी केली. या कार्यक्रमास ठाणे,कल्याण व भिवंडीतून संघ कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.(प्रतिनीधी)
कौशल्य विकास देशासाठी वरदान
By admin | Published: October 20, 2015 11:37 PM