मीरारोड -
मीरा भाईंदर शहरास सूर्याचे पाणी मिळणे सुरु होण्याआधी अंतर्गत जलवाहिन्यांच्या वितरण व्यवस्थेचे जाळे आवश्यक असून राज्य शासनाने त्यासाठी ४७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या शिवाय शहरातील विविध विकासकामांसाठी महाविकास आघाडी शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती आमदार गीता जैन यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
२०२० पासून कोरोनाच्या नैसर्गिक आपत्ती मुळे मोठ्या प्रमाणात शासनाने नागरिकांच्या आरोग्य व जीविताच्या सुरक्षेवर खर्च केला.कोरोना काळात आमदार निधीतून पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात ऑक्सिजन मशीन व व्हेंटीलेटर साठी सुमारे १ करोड ३० लाख रुपयाचा खर्च करण्यात आला. कोरोना संकटा नंतर आता राज्य शासना कडून मीरा भाईंदर साठी महत्वाच्या योजना आणि कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. सूर्या पाणी पुरवठा योजनेसाठी शासन खर्च करत असून लवकरच सूर्याचे पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
सूर्याचे पाणी येण्याआधी शहरातील अंतर्गत मुख्य जलवाहिन्या व वितरण व्यवस्था उभारणे आवश्यक असून महापालिकेने त्यासाठी ४७३ कोटींचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे . परंतु इतका मोठा खर्च करण्यास महापालिका सक्षम नसल्याने शासनाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानाअंतर्गत ४७३ कोटी रुपयाचा निधी आपल्या पाठपुराव्यामुळे मंजूर करण्यात आल्याचे आ. जैन यांनी सांगितले.
शासनाच्या अंदाजपत्रकात तसेच प्रशासकीय स्तरावर विविध कामां साठी निधी मंजूर करण्यात आला आहे. पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी नागरी सुविधा पुरविण्यासाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. भाईंदर पश्चिमच्या चौक येथील धारावी किल्ल्याच्या सुशोभीकरण साठी चे सुशोभिकरण व मजबुतीकरण करण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे यांनी खासदार राजन विचारे व आपल्या विनंती वरून १० कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे.
भाईंदर वरून वसई आणि इकडे ठाणे , कल्याण - डोंबिवली , भिवंडी या ठिकाणी ये - जा करण्यास जलवाहतूक आणि रो रो सेवा साठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन ५० कोटी तर केंद्राने ५० कोटी निधी मंजूर केला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलवाहतुकीसाठी जेट्टी बांधकाम , खाड्यांचे खोलीकरण आदी कामांसाठी ३३० कोटींची तरतूद मंजूर केली आहे . जेणे करून नागरिकांना जलवाहतुकीची सुविधा मिळणार आहे . शहरातील विविध कामे व निधीची मंजुरी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत दलित वस्तीसाठी १ कोटी रुपयाचा निधी, शहरातील जवळपास १५ उद्याना मध्ये ओपन जिम व आवश्यक त्या कामासाठी सुमारे २ कोटी , भाईंदर पूर्व रेल्वे समांतर रनाला बांधण्यासाठी ४० लाख , मीरारोड पूर्व येथे डेल्टागार्डन बिल्डिंग जवळील चौक व सिग्नल सुविधा उभारण्यासाठी ४० लाख , मीरारोड पूर्व, नया नगर येथील आरक्षण क्र. १७८ येथील उद्यानाचे सुशोभिकरण करण्यासाठी ६५ लाख , १७ ठिकाणी हायमास्ट उभारण्यासाठी जवळपास २ कोटी २५ लाख , मुर्धा गाव येथे जेष्ठ नागरीक केंद्र व वाचनालय साठी १ कोटी , उत्तन पोलीस स्टेशन हद्दीत सी.सी.टीव्ही लावण्यासाठी १ कोटी , पंडित भीमसेन जोशी रूग्णालया जवळील आरक्षण क्र. ९४ येथे स्केटिंग पार्क बनविण्यासाठी पहिल्या टप्प्यात ७५ लाख , मीरारोड पूर्व येथील स्मशानभूमि दुरुस्ती व सुशोभिकरणासाठी ५० लाख रुपये,पेणकरपाडा येथील स्मशानभूमीसाठी २० लाख रुपये , भाईंदर पश्चिम येथील मांदली तलाव सुशोभिकरणासाठी ७५ लाख रुपये , भाईंदर पश्चिम येथील महाराणा प्रताप उद्यान नव्याने विकसित करून म्युझिकल गार्डन बनविण्यासाठी ४५ लाख रुपये, शहरातील रस्त्याच्या सिमेंट कॉक्रीटीकरणासाठी ५ कोटी रुपयाचा निधी ,
सुभाषचंद्र बोस मैदान ते उत्तन गाव टप्पा – १ व टप्पा -२ या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करणे यासाठी निधीची मंजुरी केली जाणार आहे . नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएचे आयुक्त व महापालिका आयुक्त यांची बैठक बोलावून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. भाईंदर पोलीस ठाण्याचे नूतनीकरण व आधुनिकीकरण साठी आवश्यक निधी व अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रविकास योजना अंतर्गत १ कोटी रुपयाच्या निधीचा पाठपुरवा सुरु असून ह्या दोन्ही कामासाठी निधी मंजूर होईल असा विश्वास आमदार गीता जैन यांनी बोलून दाखवला.