ठाणे - ठाणे महापालिकेच्या चार तरण तलावांना रोज सहा लाख लीटर पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची गंभीर नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली होती. त्यानंतर सर्व पक्षीयांनी यावर तोडगा काढण्याची मागणी केल्यानंतर आता पाणी पुरवठा विभागाने या तरण तलावांना बोअरवेलचे पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच या ठिकाणी आरओ प्लान्टसुध्दा विकसित केला जाणार असून बोअरवेलचे पाणी तरण तलावाबरोबरच पिण्यासाठी देण्याचा विचार सुरु झाला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे कामही सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली. मागील आठवड्यात शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या नगरसेविका मालती पाटील यांनी शहरातील महापालिकेच्या स्विमींग पुलांना कोणते पाणी वापरले जाते असा सवाल उपस्थित केला होता. त्यानुसार या तरण तलावांसाठी पिण्याचे पाणी दिले जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अर्जुन अहिरे यांनी दिली. या तरण तलावांसाठी रोज प्रत्येकी दिड लाख लीटर पाणी दिले जात असून चार तरण तलावांसाठी सहा लाख लीटर पाणी पुरविले जात आहे. एकीकडे शहरात सध्या पाणी कपातीचा सामना ठाणेकरांना करावा लागत आहे. आजच्या घडीला २२ टक्के पाणी कपात लागू आहे. त्यात काही वेळेस उंच ठिकाणावरील भागांना पाणी दोन दोन दिवसांच्या फरकाने येत आहे. असे असतांना तरण तलावांना पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याने यावर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.परंतु याची दखल आता पाणी पुरवठा विभागाने घेतली असून या तरण तलावांच्या ठिकाणी बोअरवेल विकसित करता येऊ शकते का? याची चाचपणी करण्याचे काम सुरु झाले आहे. त्यानंतर प्रत्येक तरण तलावाच्या ठिकाणी खाजगी तरण तलावाप्रमाणेच बोअरवेल विकसित केली जाणार असून त्याचे पाणी यासाठी वापरले जाणार आहे. तसेच या ठिकाणी आरओ प्लान्टसुध्दा विकसित केला जाणार असून या बोअरवेलच्या पाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी पिण्यायोग्य केले जाणार आहे. त्यानुसार याचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम आता हाती घेण्यात आले असून, येत्या काही दिवसात हा अहवाल तयार होऊन तो मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.