ठाणे : महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या ताफ्यात नव्याने स्लीपर-कम-सीटर विनावातानुकूलित बस नवीन रंगात दाखल झाली आहे. निमआरामप्रमाणे या बसचे भाडे असणार असून त्यात १५ स्लीपर सीट, तर ३० सीटर सीटची खास व्यवस्था आहे. गुरुवारपासून ही बस ठाणे विभागाच्या बोरीवली येथून अक्कलकोट मार्गावर धावू लागली.
ठाण्याप्रमाणे नव्याने दाखल झालेली बस पालघर आणि मुंबई या विभागांतून धावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.सोलापूर पासिंग असलेल्या या स्लीपर-कम-सीटर विनावातानुकूलित दोन बस नुकत्याच ठाण्यात दाखल झाल्या आहेत. त्यानंतर, ती बस प्रवाशांच्या मागणीनुसार अखेर बोरीवली-अक्कलकोट या मार्गावर सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, बोरीवली येथून ठाण्याला येऊन पुढे अक्कलकोट येथे रवाना होत आहे. ही बस बोरीवली येथून दररोज सायंकाळी ६ वाजता सुटणार आहे. तसेच अक्कलकोट येथूनही दुसरी बस सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुटणार आहे. या मार्गावरील भक्तांच्या मागणीनुसार ही सेवा सुरू केल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.असे आहे भाडेबोरीवली ते अक्कलकोट प्रवासाचे भाडे ८१५ रुपये, तर ठाणे ते अक्कलकोट हे ७६५ रुपये इतके आहे. तसेच बोरीवली ते सोलापूरचे भाडे ७४५, तर बोरीवली-स्वारगेटचे भाडे हे ३२० असणार असल्याची माहिती ठाणे एसटी विभागाने दिली.