सदानंद नाईक/ उल्हासनगर : कॅम्प नं-३, सपना गार्डन परिसरात ५ कोटीच्या निधीतून उभे राहिलेल्या सिंधूभवनचे रविवारी लोकार्पण झाले. मात्र पहिल्या दिवसापासूनच भवनांवर बीओटीची टांगती तलवार उभी ठाकल्याचा संशय सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
उल्हासनगरात उत्तर भारतीय भवन, सिंधूभवन, मराठी भवन आदींची मागणी वेळोवेळी झाली. सन-२०१६ साली तत्कालीन नगरसेवक व माजी महापौर ज्योती कलानी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी सिंधी समाजाची संस्कृती जपली जावी म्हणून सिंधू भवनाची मागणी केली. तसेच महापालिकेत प्रस्तावाला मान्यता दिली. त्यासाठी सुरवातीला १ कोटीच्या निधीची तरतूद केली होती. मात्र त्यानंतर निधीत वाढ होऊन तब्बल ६ वर्षानंतर ५ कोटीच्या निधीतून सिंधुभवन उभे राहिले आहे. सिंधूभवनाचे लोकार्पण बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आदींच्या हस्ते झाले.
सिंधूभवनात सिंधू संस्कृतीचा इतिहास मांडण्यात येणार असून यामध्ये सिंधू संस्कृतीची झलक दिसणार आहे. सिंधी समाजाचे आस्था असलेल्या सिंधुभवन खाजगी ठेकेदाराला बीओटी तत्वावर देऊ नये. अशी मागणी सिंधी समाज बांधव व सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने लोकार्पणच्या दिवसी करण्यात आली. या मागणीने सिंधुभवनवर बीओटीची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. शहराची शान असलेले टॉउन हॉल, तरण तलाव यापूर्वीच यापूर्वीच बीओटी तत्वावर दिले. तर महापालिकेच्या २०० बेडच्या रुग्णालयाचे खाजगीकरण केले असून शाळा व इतर मालमत्ता नाममात्र दराने भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. या वास्तू प्रमाणे सिंधूभवन बीओटी तत्वावर देऊ नये. यासाठी लोकार्पणच्या पहिल्या दिवसापासून मागणी होत आहे.
सिंधूभवनाचे बांधकाम तीन मजल्याच्या असून तळमजला + दोन मजले असे आहे. दुसऱ्या मजल्यावर ३०० सीटचे बैठकी सभागृह आहे. या ठिकाणी विविध नाटाकांचे प्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तर तळमजला व पहिल्या मजल्यावर ३७० चौ.मीटरचे भव्य सभागृह आहे. या ठिकाणी स्थानिक नागरिकांना विविध धार्मीक कार्यक्रम, लग्नसोहळे, पगडी, सभा व इतर सामाजिक कार्यक्रमांकरिता उपयोग होणार आहे.