ठाणे : बाल अत्याचाराच्या चार प्रकरणांमध्ये ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोन आरोपींना फाशीची तर दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींना महिला दिनीच कठोर शिक्षा सुनावून न्यायालयाने समाजातील नराधमांना एक प्रकारे कडक तंबीच दिली आहे.ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश एस. ए. सिन्हा यांच्या न्यायालयाने शुक्रवारी बाल अत्याचार आणि खुनाच्या चार प्रकरणांत निकाल दिला. त्यापैकी कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात अवघ्या तीन वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा मृतदेह वाघबीळ येथील जंगलामध्ये एका डबक्यात फेकला होता. यातील नराधम रामकिरत याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.दुसरे प्रकरण भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. गेल्या वर्षी घडलेल्या या घटनेतील साडेचार वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांशी आरोपीचे आर्थिक वाद होते. यातूनच आरोपी मोहम्मद आबेद शेख याने मुलीवर अत्याचार केल्यानंतर, डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली. न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली.गेल्या वर्षी मार्च महिन्यात कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी एक संतापदायक घटना घडली होती. या प्रकरणामध्ये भांडुप येथील एका पाच वर्षीय मुलीला आइसक्रीमचे आमिष दाखवून ठाण्यातील घोडबंदर रोडवरील निर्जनस्थळी तिच्यावर अत्याचार केला. तिच्या कानातील सोन्याच्या रिंगा दाताने तोडून आरोपीने क्रौर्याचा कळस गाठला.नंदकुमार झा हे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चौथ्या घटनेत आठ वर्षांच्या मुलावर अत्याचार करून त्याचा खून करण्यात करण्यात आला होता.दोन वर्षांपूर्वी मुंब्य्रात घडलेल्या या प्रकरणातील आरोपी मोहम्मद शकील पठाण याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चारही प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वला मोहोळकर यांनी काम पाहिले.
अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दोघांना फाशी, तर दोघांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 6:40 AM