ठाणे: बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या भावेश प्रजापती (३२, रा. दिवा, ठाणे) आणि संदेश कोठारी (३६, रा. आंबेवाडी, वागळे इस्टेट, ठाणे) दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट ५ च्या पथकाने शनिवारी अटक केली. त्यांच्याकडून सहा हजारांच्या बनावट नोटा हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वीर सावरकरनगर येथील साईपॅलेस हॉटेल समोर दोघेजण बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची टीप वागळे इस्टेट युनिट ५ चे पोलीस हवालदार राजा क्षत्रिय यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, हवालदार क्षत्रिय, विजय गोरे, अजय फराटे आणि रुपवंत शिंदे आदींच्या पथकाने १३ जुलै रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास सापळा रचून भावेश आणि संदेश या दोघांना सावरकरनगर येथून ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीमधून दोन हजार दराची एक, पाचशे रुपये दर्शनी मूल्य असलेल्या पाच, दोनशे रुपये दराच्या सहा आणि १०० रुपये दराच्या तीन नोटा अशा सहा हजारांच्या १५ बनावट नोटा त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या आहेत. भारतीय दंड विधानाच्या कलम ४८९ (क) नुसार या दोघांविरुद्ध सरकारतर्फे क्षत्रिय यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात १३ जुलै रोजी गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार हे अधिक तपास करीत आहेत. त्यांनी या नोटा कोणाकडून आणल्या ते नोटा कोणाला वटविणार होते, या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचेही पवार यांनी सांगितले.
ठाण्यात बनावट नोटा वटविणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 10:03 PM
ठाण्यातील वागळे वीर सावरकरनगर भागात बनावट नोटा वटविण्यासाठी आलेल्या भावेश प्रजापती आणि संदेश कोठारी या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटच्या पथकाने शनिवारी अटक केली. दोन हजार आणि शंभराच्याही बनावट नोटा त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्यामुळे बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रीय झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई सहा हजारांच्या नोटा हस्तगतवर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल