भिवंडी - इमारत दुर्घटनेत महतो परिवारावर काळाने घाला घातला. दोन चिमुरड्यांसह त्यांची आई ढिगाऱ्याखाली अडकली. बचाव पथकाने मोठ्या परिश्रमाने दोन्ही चिमुरड्यांची सुटका केली. मात्र, आई दगावल्याने मातृछत्र हरपले. लक्ष्मी रवी महतो (३२) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रिन्स रवी महतो (५) व चिंकू रवी महतो (३) अशी चिमुरड्यांची नावे आहेत. लक्ष्मी यांचे पती रवी महतो कामावर गेले होते. दरम्यान, मुलांना उपचारासाठी स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आले.
भावाचा निदान आवाज तरी ऐकू दे...इमारत कोसळल्याचे कळताच तिथे धाव घेतलेल्या बहिणीने भावाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी तिला पुढे जाण्यास मज्जाव केला. यावेळी, ‘मला माझ्या भावाचा निदान आवाज तरी ऐकू दे,’ अशी आर्त साद तिने पोलिसांना घातली. दिवा येथे राहणारा सुधाकर गवई (२६) हा तरुण या कंपनीत कामाला आहे. बहिण विक्रोळीत राहाते. घटनेबाबत कळल्यानंतर तिने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ढिगाऱ्याखालून आवाज येत असल्याचे सांगितले. तेव्हा मला माझ्या भावाला बघायचे आहे, मला पुढे जाऊ द्या, असे ती पोलिसांना म्हणाली.