लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी परिणामकारक आहेत. परंतु, ठाणे जिल्ह्यात कोविशिल्डच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचा साठा पुरेसा येत नसल्याने कोविशिल्डलला अधिक पसंती दिली जात आहे. खासगी केंद्रावरदेखील आता लसीकरण सुरू केले आहे. परंतु, त्या ठिकाणीदेखील कोविशिल्डच उपलब्ध होत आहे. या दोन्ही लस प्रभावी असल्या तरी कोविशिल्डची प्रभाव क्षमता ७१ टक्के तर कोव्हॅक्सिनची प्रभाव क्षमता ८१ टक्के एवढी आहे. परंतु, कोव्हॅक्सिनचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने कोविशिल्डलाच अधिक पसंती जिल्ह्यात दिली जात आहे.
जेव्हा कोरोना अधिक प्रमाणात वाढत होता, त्यावेळेस कोविशिल्ड प्रथम पुढे आली. जेव्हा तो कमी होत गेला तेव्हा कोव्हॅक्सिनची लस आली. परंतु, या दोन्ही लसी कोरोनाला तितक्याच प्रमाणात रोखण्यात प्रभावशाली आहेत. असे असले तरी सुरुवातीला कोविशिल्डचा प्रभाव हा ७१ टक्के सांगितला गेला होता. तसेच कोव्हॅक्सिनचा प्रभाव हा ८१ टक्के सांगितला गेला. त्यामुळे सुरुवातीला काही प्रमाणात कोव्हॅक्सिनला नागरिकांनी पसंती दिली. त्यानंतर मात्र ज्यांनी कोविशिल्डची लस घेतली असेल त्यांनाच विमान प्रवासाची मुभा दिल्यानेदेखील कोविशिल्डची पसंती वाढली. जिल्ह्याचा विचार केल्यास आतापर्यंत कोविशिल्डचा १७ लाख ७३ हजार ९४७ जणांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. तर कोव्हॅक्सिनचा एक लाख ८५ हजार ६२७ पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी कोविशिल्डचाच साठा येत आहे. सुरुवातीपासून तो कोव्हॅक्सिनच्या तुलनेत अधिक आला आहे. त्यामुळेच नागरिकांनीदेखील कोविशिल्डला अधिक पसंती दिली आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस मिळेल का नाही, याबाबतही नागरिकांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे परिणामकारकता कोव्हॅक्सिनमध्ये अधिक असली तरीदेखील त्या उपलब्ध होत नसल्याने कोविशिल्डला अधिक पसंती दिली जात आहे.
एकूण लसीकरण - १९ लाख ५९ हजार ५७४
कोविशिल्ड - १७ लाख ७३ हजार ९४७
कोव्हॅक्सिन - एक लाख ८५ हजार ६२७
वयोगटानुसार लसीकरण
(ग्राफ)
कोविशिल्ड
पहिला डोस - १४ लाख ५२ हजार ८४६
दुसरा डोस - तीन लाख २१ हजार १०१
आरोग्य कर्मचारी - एक लाख ३८ हजार ८९३
फ्रंटलाइन - एक लाख ४६ हजार ९७८
१८ ते ४४ - ४४ हजार ४९१
४५ ते ५९ - पाच लाख ४० हजार २८७
६० वर्षांवरील - चार लाख २७ हजार ४८७
कोव्हॅक्सिन
पहिला डोस - एक लाख चार हजार ६९२
दुसरा डोस - ८० हजार ९३५
आरोग्य कर्मचारी - पाच हजार २८२
फ्रंटलाइन - दहा हजार ८७६
१८ ते ४४ - २८ हजार ४६५
४५ ते ५९ - ११ हजार ३२२
६० वर्षांवरील - २६ हजार ८२८
कोविशिल्डच का?
कोविशिल्डचा साठा अधिक प्रमाणात येत आहे. तसेच प्रत्येक केंद्रावर कोविशिल्डचीच लस दिली जात आहे. दुसरा पर्याय उपलब्ध नाही, तसेच कोव्हॅक्सिनचा साठा अपुऱ्या प्रमाणातच जिल्ह्यात येत आहे. तसेच पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा मिळेल की नाही, याबाबत शंका असल्याने कोविशिल्डलाच अधिक पसंती दिली जात आहे.
......
कोविशिल्डचा साठा कोव्हॅक्सिनच्या तुलनेत अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे कोविशिल्डच्या लस नागरिकांना दिल्या जात आहेत. शिवाय दोन्ही लसींचा प्रभाव तितकाच आहे. त्यामुळे लस घेणे हे सर्वात महत्त्वाचे आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे