ठाणे : घाेडबंदर राेडवरून भरधाव वेगाने ठाण्याकडे येणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटून तो रस्त्याच्या दुभाजकाला धडकला. ही धडक इतकी जोरात होती की तो कंटेनरने पुन्हा ठाण्याकडून बोरिवलीच्या दिशेकडे निघालेल्या केमिकल टँकरला धडकला. शनिवारी पहाटे ४.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या विचित्र अपघातात दोन्ही चालक जखमी झाले असून त्यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातग्रस्त वाहने ही दोन्ही रस्त्यावर आल्याने सकाळी काहीवेळ वाहतूककोंडी झाली होती. ही वाहने रस्त्यातून बाजूला केल्यानंतर सकाळी ८.३० ते ८.४५ वाजण्याच्या सुमारास वाहतूक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.
ठाण्यातील ब्रह्मांड सिग्नलपूर्वी कंटेनरचालकाचा कंटेनरवरील ताबा सुटून ताे रस्त्याच्या दुभाजकाला धडकला. त्यानंतर दुभाजकावरून तो ठाण्याकडून तारापूरला निघालेल्या केमिकल टँकरवर धडकला. या अपघातात कंटेनर आणि टँकरच्या केबिनचे नुकसान झाले आहे. जखमी झालेल्या कंटेनरचालकाने नाव समजू शकलेले नाही. टँकरचालकाचे नाव अशोककुमार रामबाबू पासवान असे आहे. याबाबत माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि कासारवडवली वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे झालेल्या अपघातातील वाहने दोन्ही मार्गिकेवर आल्याने घोडबंदर रोडवर वाहतूककोंडी झाली होती. यामध्ये ब्रह्मांड ते मानपाडा सिग्नल यादरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे तातडीने क्रेन बोलावून दोन्ही गाड्या रस्त्यातून बाजूला करण्यात आल्या. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. दाेन्ही जखमी वाहनचालकांवर कळवा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस तपास करत आहेत.