ठाणे : रहिवाशांच्या दुर्लक्षामुळेच राबोडी इमारत दुर्घटना घडल्याचे सांगून ठाणे महापालिकेने यातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केल्याची टीका करून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या दुर्घटनेस केवळ महापालिका अधिकारीच जबाबदार असून, त्यांच्या दुर्लक्षामुळेच दोघांचे बळी गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
राबोडी क्र.१ मधील खत्री इमारतीचा तिसऱ्या मजल्याचा स्लॅब थेट पहिल्या मजल्यापर्यंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन रहिवाशांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. रविवारी झालेल्या या दुर्घटनेची माहिती मिळताच केळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन रहिवाशांशी संवाद साधून मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तर उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने कार्यवाही करून रहिवाशांना दिलासा देण्याच्या सूचना केल्या.
खत्री इमारत दुर्घटनेप्रकरणी महापालिकेची जबाबदारी केवळ नोटीस बजावण्यापुरती नसून धोकादायक इमारतींतील रहिवाशांचा जीव वाचविण्यासाठी वेळीच कार्यवाही करण्याची गरजसुद्धा आहे. अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे दोन रहिवाशांचा बळी गेला आहे. वेळीच इमारत दुरुस्त करण्यासाठी रहिवाशांना इमारत खाली करण्यास सांगितले असते तर घटना टाळता आली असती, असे ते म्हणाले.
ठाणे शहरात अनेक धोकादायक इमारतींचा प्रश्न अजूनही मार्गी लागला नसून पुनर्वसन आणि पुनर्बांधणीबाबत शासन ठोस निर्णय घेत नाही, असा आरोपही त्यांनी केला.