कल्याण : कल्याणमधील दूधनाका परिसरातील मोहल्ल्यातून चार युवक मे २०१४ पासून बेपत्ता होते. त्यापैकी एक आरिब मजिद हा युवक एनआयएच्या ताब्यात आहे. मात्र पहाद शेख, सलीम टंकी आणि अमान तांडेल हे तिघे अद्याप बेपत्ता असून त्यापैकी शेख व तांडेल हे इसिसमध्ये कार्यरत असून टंकी मारला गेल्याचे बोलले जाते. यामुळे फ्रान्सवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात भीतीचे व चिंतेचे वातावरण आहे.यावर्षी नोव्हेंबरच्या सुमारास आरिबला एनआयए ने ताब्यात घेतले होते. मात्र त्यानंतरचा तपास किती पुढे गेला, त्याचे काय झाले याबाबतची माहिती अद्यापही गुलदस्त्यातच आहे. याखेरीज अन्य तिघांचा नक्की ठावठिकाणा लागलेला नाही. मात्र गुुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, शेख व तांडेल हे इसिसमध्ये कार्यरत आहेत. शेख हा इसिसच्या प्रचार यंत्रणेत काम करतो. त्याने आतापर्यंत दोन डझनांहून अधिक टिष्ट्वटर हँडल तयार केली असल्याची माहिती आहे. तांडेल हा प्रत्यक्ष लढाईत सहभागी आहे, असे कळते. टंकीचा मृत्यू झाल्याचे कळते. मात्र अद्याप त्याबाबत कुठलेही ठोस पुरावे मिळाले नसल्याने यावर विश्वास किती ठेवायचा यावर प्रश्नचिन्ह आहे. पॅरीसवर झालेल्या दहशतवादी हल्लयानंतर भारतभर सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यातच भारतातील किमान १५० जण इसिसच्या संपर्कात असण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांचा हवाला देत प्रसिद्धी माध्यमांकडून वर्तवण्यात आली होती. असे असतांनाही कल्याणच्या या तिघा बेपत्ता युवकांपैकी दोनजण इसिसमध्ये सक्रीय असल्याची माहिती समोर आल्याने या परिसरात सतर्क राहणे किती गरजेचे आहे ते स्पष्ट झाले आहे.या संदर्भात स्थानिक पोलीसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मध्यंतरी त्या तिघांपैकी एकाबद्दल माहिती मिळाल्याची कुणकुण यंत्रणेला लागली होती, परंतु पुढे त्याचे काय झाले याबाबत काहीही सांगण्यात आले नाही. हे युवक बेपत्ता झाल्यासंदर्भात तक्रार केली होती.
कल्याणचे ते दोघे युवक इसिसमध्ये
By admin | Published: November 21, 2015 12:52 AM