मीरारोड - मीरा भाईंदरच्या आमदार गीता जैन व ओवळा माजिवडाचे आमदार प्रताप सरनाईक हे दोघे मीरा भाईंदरच्या विविध विकासकामां साठी एकत्र आल्याचे चित्र शुक्रवारी बघायला मिळाले . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे दोन्ही आमदारांच्या मागणी वरून बोलावलेल्या बैठकीत अनेक कामांना मंजुरी मिळण्यासह अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे आमदारांनी म्हटले आहे .
मीरा भाईंदर शहराच्या समस्या दूर करून विकास कामे मार्गी लागावीत यासाठी मुख्यमंत्री यांच्या कडे झालेल्या बैठकीत येत्या ३ वर्षात शहरातील सर्व मुख्य रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यासाठी ११५० कोटींच्या प्रकल्पातील ५०० कोटी एमएमआरडीए तर १५० कोटी महापालिका खर्च करणार आहे . उर्वरित ५०० कोटींचे कर्ज एमएमआरडीए महापालिकेस ६० वर्षांच्या कालावधी साठी देणार आहे .
मीरारोड रेल्वेमार्गा वरून पूर्व - पश्चिम जोडणारा उड्डाणपुल व भाईंदर जुना फाटक येथे उड्डाणपूल एमएमआरडीए बांधणार आहे . भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदान ते मोरवा पर्यंतचा ३० मीटर रस्त्याचे काही स्थानिक लोकांनी बंद पडलेले काम आता स्थानिकांच्या घरांना हात न लावता पुन्हा सुरु केले जाणार आहे . घोडबंदर - वीज उपकेंद्र पर्यंतचा ६० मीटर रस्ता हा घोडबंदर किल्ल्यापर्यंत विकसित केला जाणार आहे .
भाईंदर पश्चिम येथील एसटी डेपोचे आरक्षण मनपा व एसटी महामंडळाने संयुक्तपणे विकसित करून तेथे एसटी व पालिकेचे बस स्थानक सुरु केले जाणार आहे . तसा सामंजस्य करार करण्यास दोन्ही विभागांना सांगण्यात आले . भाईंदरच्या उत्तन परिसरात मच्छीमारांसाठी उत्तन येथे मासळी मार्केट , फिश प्रोसेसिंग युनिट , फिशरिज हब प्रकल्पाला बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठीची जागा हस्तांतरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले . उत्तन भागात जैवविविधता उद्यान साठी पर्यावरण सह संबंधित विभागांनी पाहणी करून प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
शहरातील सार्वजनिक पथदिवे अदानी कंपनीचे असून महापालिकेला जास्त वीज बिल भरावे लागत असल्याने एलईडी दिवे लावण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्यास पालिकेला सांगण्यात आले . तलावांच्या सुशोभीकरणाचे प्रस्ताव महापालिकेने सरकारला सादर करावेत. संगीत कारंजे लावावेत . त्यासाठी निधी शासन मंजूर करेल असे आश्वासन देण्यात आले.
भाईंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधण्या बाबत जागेची मालकी असलेल्या केंद्र सरकारच्या विभागास प्रस्ताव पाठवण्याचे ठरले . ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात सर्व धर्मीय स्मशान भूमी , दफनभूमी आणि कब्रस्तानसाठी महसूल खात्याची जागा निश्चित करून ती महापालिकेस हस्तांतरित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती दोन्ही आमदारांनी दिली आहे . बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आशिषकुमार सिह, प्रधान सचिव भूषण गगराणी , सोनिया सेठी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे , महापालिका आयुक्त दिलीप ढोले, शहर अभियंता दीपक खांबित सह वित्त , मत्स्य व्यवसाय , पर्यावरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.