धीरज परब मीरा रोड : लहान मुलांचे अश्लील व्हिडीओ पुरवणाऱ्या ‘बीबी बॅड बॉइज’ या व्हॉट्सअॅप ग्रुप प्रकरणात पोलिसांनी नाशिक शहरातून दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात एकूण अटक आरोपींची संख्या सात झाली आहे. केवळ देशातीलच नव्हे, तर काही आंतरराष्ट्रीय सदस्यही या ग्रुपमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नऊ ते १२ वर्षे वयोगटांतील मुलामुलींशी शरीरसंबंध कसे ठेवायचे, यासाठी त्यांना प्रवृत्त कसे करायचे, याच्या व्हिडीओ क्लिप्स आणि छायाचित्रे पुरवण्याचे काम काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर सुरू असल्याची माहिती मीरा रोडचे रहिवासी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सामंत यांना मिळाली होती. सामंत हे सामाजिक उद्दिष्टांसाठी हॅकिंगचे ज्ञान बाळगून असल्याने त्यांनी अशा प्रकारचे चार व्हॉट्सअॅप ग्रुप शोधून काढले. भार्इंदरच्या नवघर भागातील एका तरु णाचा बीबी बॅड बॉइज या ग्रुपमध्ये सहभाग असल्याचे त्यांना समजले. सामंत यांनी हा ग्रुप हॅक करून त्यातील २२० सदस्यांची नावे, त्यांचे मोबाइल नंबर, ई-मेल आयडी आणि त्यांच्या लोकेशनपासून त्यांनी ग्रुपमध्ये कायकाय शेअर केले, याचा संपूर्ण तपशील जमा केला. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक नवल बजाज यांना भेटून या प्रकाराची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. बजाज यांनी सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे या प्रकरणाचा तपास दिला.नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर कुलकर्णी यांच्यासह इतर पोलीस पथकांनी आरोपींचे अटकसत्र सुरू केले. तूर्तास पोलिसांनी बॅड बॉइज या एकाच ग्रुपच्या आरोपींचे अटकसत्र चालवले आहे. या ग्रुपच्या २२० सदस्यांपैकी तीन अॅडमिन असून ४० सदस्य महाराष्ट्रातील, तर उर्वरित सदस्य हे गुजरातसह विविध राज्यांतील आहेत.पोलीस पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकून पाच आरोपी आयटी अॅक्टअन्वये अटक केले होते. शनिवारी पोलिसांनी नाशिक शहरामधून १९ आणि २५ वर्षे वयाच्या दोन तरु णांना अटक केली. ठाणे न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली आहे. ग्रुपचे सदस्य त्यांच्या परिचितांकडून ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी परस्पर पैसेही उकळत होते. ग्रुपच्या अॅडमिनला अटक केल्यानंतर या रॅकेटचा एकूणच विस्तार, कार्यपद्धती आणि आर्थिक व्यवहार समोर येण्याची शक्यता आहे. अशाच प्रकारचे आणखी तीन व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू असल्याची पोलिसांची माहिती आहे.
अश्लील व्हॉट्सअॅप ग्रुपप्रकरणी नाशिक येथून दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 5:13 AM