- लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एमडी पावडर विकणाऱ्या जमीर उर्फ जव्वा नुरुल इस्लाम शेख (२८) आणि मोबीन निजामुद्दीन अन्सारी (२९, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. त्यांच्याकडून ११५ ग्रॅम वजनाची दोन लाख ३० हजारांची एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.वागळे इस्टेट भागातील ठाणे महापालिकेच्या सावित्रीबाई खेतले उद्यानातील गेटजवळ जमीर हा आपल्या साथीदारासह मेफेड्रॉन (एमडी) पावडरची विक्री करीत असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी १८ मे रोजी रात्री हाजुरी परिसरात धाड टाकली. यात जमीर व मोबीनकडून पोलिसांनी ११५ ग्रॅम वजनाची दोन लाख ३० हजारांची एमडी पावडर जप्त केली. दोन्ही आरोपींना ठाणे न्यायालयाने २६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.