उमेश जाधव, टिटवाळा-: दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मोहिली व टिटवाळा येथील पंपहाऊस पाण्यात गेल्याने दोन दिवसापासून पाणी पुरवठा बंद होता. यामुळे येथील हजारो लोकांन पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले होते. अखेर मंगळवारी दुपार पासून दोन्ही पंप हाऊस सुरू झाले असून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
शनिवारपासून तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील काळू, भातसा व उल्हास या नद्यांना पूर आल्याने टिटवाळा व मोहिली येथील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याच्या पंप हाऊस मध्ये पुलाचे पाणी शिरल्याने या दोन्ही योजना बंद होत्या. यामुळे मोहिली, उंभर्णी, बल्याणी, मोहने, गाळेगाव, आंबिवली वडवली, अटाळी व शहाड येथील हजारो लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद झाला होता. सोमवारी काही प्रमाणात पाणी ओसल्यावर या दोन्ही पंपावर महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रंदिवस काम केल्याने या दोन्ही योजना सुरू करण्यात त्यांना यश आले. दुपार नंतर सर्व परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.