अंबरनाथ : अंबरनाथ मधील बहनोली गावात गोव्याची निकृष्ट दारू थेट महागड्या विदेशी दारुच्या बाटलीत भरुन ती सीलबंद करण्याचा व्यवसाय सुरु होता. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई विभागाचे निरीक्षक दिपक परब यांना मिळताच त्यांच्या पथकाने या ठिकाणी कारवाई केली.
या कारवाई 30 लाख रुपये किंमतीचे गोवा येथील हलक्या प्रतीची दारू जप्त केली आहे. ही बनावट दारू विदेश बाटलीत भरुन 5 ते 10 पट जास्त किमतीत विकण्याचा हा व्यवसाय असल्याचे समोर आले आहे. ही सर्व दारू परिसरातील धाब्यांवर विकण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अंबरनाथ बहनोली गावातील एका फार्म हाऊसमध्ये हा व्यवसाय सुरु होता. गोव्यातील 90 रुपये लिटरणे मिळणारी हलक्या प्रतीची दारू आणून ती दारू महागड्या कंपनीच्या दारुच्या बाटल्यांमध्ये भरुन त्या बाटल्या सिलबंद केले जात होते. तब्बल ही दारू 500 ते 1000 रुपये प्रती लिटरणे विकण्याचा व्यवसाय सुरु होती.
अंबरनाथ आणि कल्याण परिसरातील धाब्यांवर किंवा हॉटेलमध्ये रिकाम्या झालेल्या दारुच्या बाटल्या एकत्रित करुन त्या बाटल्यांमध्ये थेट गोव्यातील स्वस्त दारू टाकुन त्याला संबंधीत कंपनीचे सील असलेले झाकण बसवित त्यांची थेट विक्री केली जात होती. विदेश आणि भारतातील बड्या ब्रँडच्या दारुच्या बाटल्यांमध्ये ही दारू भरुन त्याला सील लावले जात असल्याने अशा दारुच्या बाटल्या ह्या लहान मोठय़ा बार, धाबे या ठिकाणी विकण्यास ठेवले जात होते. त्याची माहिती मुंबईच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच त्यांच्या पथकाने कारवाई करीत पहाटे ही सर्व विदेशी दारू आणि त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.
हा प्रकार ज्या फार्महाऊसमध्ये सुरु होता त्या घराचा मालक जगदीश लालचंद पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा घटनेनंतर आरोपी फरार झाला असुन त्याचा शेध सुरु आहे.