लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : यंदा ठाण्यात प्रचंड उत्साहात दहीहंडीचा सण साजरा केला गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील महत्त्वाच्या दहीहंड्यांना भेटी देऊन आपली राजकीय मांड पक्की केली. वेगवेगळ्या मंडळांनी जाहीर केलेल्या बक्षिसांची एकत्रित रक्कम काही कोटी रुपयांत असल्याने मुंबई, ठाणे, पालघर येथून गोविंदा पथके ठाण्यात दाखल झाली होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर गर्दी केल्याने दिवसभर वेगवेगळ्या भागात वाहतूक कोंडी झाली होती.
स्व. आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्याच्या दहीहंडीला शिंदे यांनी स्वत: दुपारी भेट दिली. तेथे अभिनेत्री श्रद्धा कपूर उपस्थित होती. भगवती शाळेच्या मैदानावर मनसेची दहीहंडी लागली होती. दहा थर लावणाऱ्या पथकाला स्पेन वारीचे बक्षीस मनसेने जाहीर केले होते. दिवसभर या बक्षिसांवर नाव कोरण्याकरिता अनेक गोविंदा पथकांनी प्रयत्नांची शिकस्त केली.
वर्तकनगर येथील आ. प्रताप सरनाईक यांच्या दहीहंडीपाशी प्रो गोविंदांच्या मनोरे रचण्याचे प्रात्यक्षिक पाहून उपस्थित थक्क झाले. जांभळी नाका येथील दहीहंडी खासदार राजन विचारे यांनी लावली होती. ठाण्यात निष्ठेचे थर लावणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. महिला गोविंदा पथकांनीही थर लावून बक्षिसे मिळविली.
डोंबिवलीत उत्साह
डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लावलेल्या दहीहंड्या फोडण्याकरिता दिवसभर गोविंदा पथकांचे प्रयत्न सुरू होते. भिवंडीत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या दहीहंडीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.