डोंबिवली: घरातून मोबाइल आणि रोख रक्कम घेऊन १२ वर्षीय मुलगा घरातून पळून गेला. लोकलने प्रवास करत असताना तो सुदैवाने डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी पालकांचा शोध घेऊन या लहानग्याला पालकांच्या स्वाधीन केले. मुलाला सुखरूप पाहून पालकांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले. पोलिसांनी सतर्कता दाखवल्याने बारा वर्षीय मुलगा पालकांना सुखरुप मिळू शकला.
डोंबिवलीकडे लोकलने येत असताना मध्य बाजूकडील प्रथमश्रेणी वर्ग डब्यात एक अनोळखी लहान मुलगा विनापालकांसह पोलिसांना शुक्रवारी आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता हा मुलगा घरातून निघून आला होता. त्याच्याकडे साधारण १० हजार किमतीचा एक मोबाइल आणि १९ हजार ३०० रुपयांची रोकडही सापडली. पोलिसांनी प्रभारी पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्यासमोर हजर करून पुन्हा चौकशी केली. या मुलाने त्याचे नाव सांगितल्यानंतर आणि दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पालकांचा शोध घेतला. त्यानंतर या मुलाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. एवढी मोठी रक्कम त्याच्याकडे कुठून आणि कशी आली याची चर्चा पोलिसांमध्ये रंगली होती.