ठाणे: ‘मुलाच्या मृत्यूचे ऐकून वाईट वाटले, पण आम्हीच आता वृद्ध झालो आहोत, आम्ही तिकडे (ठाण्यात) येऊ शकत नाही, त्यामुळे काय तो तुम्हीच निर्णय घ्या,’ अशी हतबलता शोमीक घोष (३९) ची कोलकता येथे असलेली आई जयश्री बिजोय घोष यांनी कासारवडवली पोलिसांना फोनवरून व्यक्त केली. शोमीकने मुलाचा खून करून स्वत:ही आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिल्यानंतर त्यांनी ही हतबलता व्यक्त केली.लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर असलेल्या संगीत शिक्षक शोमीक यांने बुधवारी दुपारी कासारवडवलीतील ‘विजय एनक्लेव’ येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी, त्याने पत्नी दिया आणि ठाणे पोलिसांच्या नावाने प्रत्येकी एक तर घरमालकाच्या नावाने दोन अशा चार वेगवेगळ्या चिठ्ठया लिहून ठेवल्या आहेत. शास्त्रीय नृत्यांगना असलेल्या आपल्या दुसऱ्या पत्नीवर प्रचंड प्रेम असल्याचे त्याने त्यात म्हटले आहे. पण तीही तीन महिन्यांपूर्वी त्याला सोडून गेल्याचा विरह सहन होत नाही आणि याच विरहातून आपण ही आत्महत्या करीत असल्याचे त्याने म्हटले आहे.शोमीक आणि त्याचा मुलगा एकांक्ष (७) या दोघांच्या मृत्युची घटना उघड होताच परिसरात एकच खळबळ उडाली.त्याची पत्नी दिया आणि कोलकत्ता येथे राहणारे आईवडिल यांचा पोलिसांनी फोन मिळवून त्यांच्याशी बातचीत केली. तेंव्हा पत्नीने काहीशा नाराजीनेच पोलिसांना प्रतिसाद दिला, तर आईने फारसा खेद न व्यक्त करता, ‘शोमीकच्या मृत्यूचे वाईट वाटले. पण आम्ही वृद्ध असल्यामुळे आम्ही तिकडे येऊ शकणार नाही. त्याबाबत काय तो अंतिम निर्णय पोलिसांनीच घ्यावा, तो आम्हाला मान्य असेल.’, असे पोलिसांना सांगून टाकले. त्याच्या मुलाच्या मृत्यूची पोलिसांनी माहिती दिल्यानंतर जयश्री म्हणाल्या, आम्हाला तर त्याने लग्न केल्याचीही माहिती नाही. २००० सालापासून त्याचा आमचा काहीच संबंध उरलेला नाही.’ असेही त्यांनी स्पष्ट केले. तर त्याच्या वडिलांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. त्याची पत्नी दिया हिला माहिती दिल्यानंतर तिने मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली. उत्तरीय तपासणी आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर पोलीस शोमीक आणि एकांक्ष या पिता पुत्राचे मृतदेह तिच्या ताब्यात देतील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मुलगा गेला, पण आमचा त्याचा संबंध नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 2:25 AM