कल्याण : कल्याणचे तहसीलदार, केडीएमसीचा कनिष्ठ अभियंता असे अधिकारी एकापाठोपाठ लाचेच्या हव्यासापोटी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याच्या घटना ताज्या असताना सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता अविनाश पांडुरंग भानुशाली यांना कार्यालयातच एक लाख रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.
मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीसाठी भूसंपादनाचे काम सध्या कल्याण तालुक्यात सुरू आहे. या महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनींचे मूल्यमापन करून अहवाल देण्याचे कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जात आहे. दरम्यान, अहवाल देण्यासाठी कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता भानुशाली यांनी अहवाल देण्यासाठी तक्रारदार बांधकाम बाधिताकडून ९ सप्टेंबरला पडताळणी दरम्यान चार लाख रुपये लाचेच्या स्वरूपात स्वीकारले. दरम्यान, आणखीन एक लाख रूपये दिल्याशिवाय अहवाल मिळणार नाही, असे त्यांनी संबंधित बाधिताला सांगितले. अखेर याची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी कल्याण शासकीय विश्रमगृहाच्या आवारात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा लावून एक लाखांची रोकड स्वीकारणाऱ्या भानुशाली यांना रंगेहाथ अटक केली.
महामार्गाच्या बांधणीत बाधित होणा-यांना योग्य तो मोबदला मिळत नाही असे आरोप, तक्रारी सर्रासपणे होत असताना दुसरीकडे मुल्यमापनाचा अहवाल देण्यासाठी बाधितांकडून लाचेची मागणी करण्याची अधिका-याची कृती चर्चेचा विषय ठरली आहे. मागे केंद्रिय मंत्री नितीन गकडरी यांनीही मुख्यमंंत्र्याना पत्र लिहून महामार्गांच्या कामात राज्यात कशा अडचणी येत आहेत, याचा पाढा वाचला होता. या पाश्वभूमीवर ही कारवाई महत्वाची मानली जात आहे.
------------------------------------------------------