ठाणे : तौक्ते चक्रीवादळानंतर ठाण्याच्या विविध भागांत वृक्ष उन्मळून पडले होते. झाडांच्या फांद्यादेखील पडल्या होत्या. परंतु, तीन दिवस उलटूनही अनेक भागांतील वृक्ष आणि फांद्या उचलण्यात आल्या नसल्याचा आरोप करून विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी बुधवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हातात फांद्या घेऊन आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी विरोधी पक्षनेत्यांसह आंदोलन करणाऱ्या इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.
महासभेच्या दिवशी केलेल्या या आंदोलनाच्या वेळी महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह हातात वृक्षांच्या फांद्या घेऊन आंदोलन केले. तीन दिवसांपासून उन्मळून पडलेले वृक्ष, फांद्या वृक्ष प्राधिकरणाने उचललेल्या नाहीत. या विभागाचे काम योग्य पद्धतीने केले जात नाही. केवळ बिल्डरांच्या फायद्याचे असलेले प्रस्ताव या विभागाकडून मंजूर केले जात आहेत. वृक्षांची छाटणी देखील केली गेलेली नाही, त्यामुळेच वृक्ष उन्मळून पडल्याचा आरोपही त्यांनी केला.