ठाणे : शाहू मार्केटमधून विस्थापित केलेल्या प्राच्य विद्या संस्थेबरोबर अद्याप कोणताही करार न केल्याने त्याचा फटका आता या संस्थेला बसला आहे. या संस्थेचे वीजबिल ठाणे महापालिकेने भरणे अपेक्षित होते. परंतु, ते न भरल्याने हाजुरी येथील संस्थेचा वीजपुरवठाच महावितरणने खंडित केल्याची माहिती समोर आली. यासंदर्भात प्राच्य विद्या संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना निवेदन दिले आहे. १९८५ पासून प्राच्य विद्या अभ्यास संस्था गोखले रोडजवळील शाहू मार्केटच्या इमारतीत कार्यरत होती. संस्थेचे वस्तुसंग्रहालय व संदर्भ ग्रंथालय तेथे होते. या संग्रहालयात शेकडो संशोधक तेथे फायदा घेत होते. महापालिका निवडणुकीचे कारण देऊन लोकांच्या सोयीचे व शहराच्या मध्यभागी असलेले हे संदर्भ ग्रंथालय हाजुरी ग्रंथालय येथील नवीन इमारतीत तीन वर्षांपूर्वी शिफ्ट केले. त्या वेळेस महापालिकेने संस्थेला सर्व मूलभूत सेवा, सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, तीन वर्षे उलटूनही यासंदर्भातील कोणताही करार अद्यापही पालिकेने केला नसल्याची माहिती बेडेकर यांनी दिली. या ग्रंथालयात सुमारे ४० हजार दुर्मीळ पुस्तके व ३००० संस्कृत हस्तलिखिते आहेत. महापालिकेने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न केल्याने सुमारे तीन वर्षे ही पुस्तके खोक्याच्या बाहेर पडू शकली नव्हती. शेवटी, नागरिक व काही हितचिंतकांना अर्ज-विनंत्या करून कपाटे मिळाल्यावर या वर्षी ही पुस्तके त्यामध्ये ठेवली आहेत.
प्राच्य विद्या संस्थेची वीज पुन्हा खंडित
By admin | Published: March 17, 2016 2:51 AM