सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेची गोरगरीब व गरजु नागरिकांना अंत्यसंस्कारला मोफत लाकडे देण्याच्या योजनेला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली. गेल्या आठ महिन्यापासून लाकडाचे पैसे महापालिकेने स्मशानभूमी ट्रस्टला दिले नसल्याने, ट्रस्ट आर्थिक संकटात सापडल्याची प्रतिक्रिया समाशंभूमीचे ट्रस्टी मेघराज लुंड यांनी दिली.
उल्हासनगरातील गोरगरीब व गरजू नागरिकांच्या नातेवाईकांना अंत्यसंस्काराला मोफत लाकडे देण्याचा निर्णय महापालिकेने घेऊन सर्व सामान्य नागरिकांना दिलासा दिला. एका अंत्यसंस्काराला एकून १६०० रुपये खर्च येतो. त्यातील लाकडाचे एक हजार रुपये महापालिका स्मशानभूमी ट्रस्टला परस्पर देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरवातीला महापालिका नियमित लाकडाचे पैसे देत असल्याने, अडचण आली नाही. मात्र गेल्या दीड वर्षांपासून लाकडाचे नियमित पैसे मिळत नसल्याने, स्मशानभूमी ट्रस्ट आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. गेल्या आठ महिन्या पासून मोफत लाकडाचे पैसे महापालिकेकडून मिळाले नसल्याची माहिती म्हारळगाव व शांतीनगर स्मशानभूमी ट्रस्टचे अध्यक्ष मेघनाथ लुंड यांनी दिली.
शहरातील कॅम्प नं-२ येथील म्हारळगाव खदान, कॅम्प नं-३ येथील शांतीनगर स्मशानभूमी ट्रस्टने गेल्या चार महिन्यापूर्वी प्रत्येकी ३०० जणांचे फॉर्म महापालिका आरोग्य विभागात भरले. त्याचे प्रत्येकी ९ लाख रुपये येणे बाकी आहे. ३०० फॉर्मचे पैसे मिळत नाही. तोपर्यंत इतर फॉर्मचे बिल महापालिका स्वीकारत नसल्याने, दोन्ही स्मशानभूमीकडे प्रत्येकी ६०० पेक्षा जास्त फॉर्म जमा करण्या ऐवजी पडून आहेत. अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष मेघनाथ लुंड यांनी दिली. तर कॅम्प नं-४ व ५ मधील स्मशानभूमी ट्रस्टने प्रत्येकी ३०० फॉर्म महापालिका आरोग्य विभागाकडे भरून प्रत्येकी ४०० फॉर्म पूर्वीच्या फॉर्मचे पैसे न मिळाल्याने, ट्रस्टकडे पडून असल्याचे लुंड म्हणाले. गेल्या ८ महिन्या पासून अंत्यसंस्काराला देण्यात आलेल्या मोफत लोखंडाचे पैसे न मिळाल्याने, ट्रस्ट आर्थिक अडचणीत सापडले आहे.
शहरातील स्मशानभूमी ट्रस्टला एका अंत्यसंस्कारा मागे एकून १६०० रुपये खर्च येतो. त्यापैकी एक हजार रुपये मोफत लाकडा साठी येत असल्याची माहिती मेघनाथ लुंड यांनी दिली. कॅम्प नं-१,३ व ५ मधील स्मशानभूमी मध्ये ६० टक्के नागरिक मोफत लाकडाचा लाभ घेतात. तर कॅम्प नं-४ मध्ये ८० टक्के नागरिक मोफत लाकडाचा लाभ घेत असल्याची माहिती ट्रस्टी लुंड यांनी दिली.अंत्यसंस्काराला लागणाऱ्या लाकडाची खरेदी पावसाळ्या पूर्वी केल्यास, सुके लाकडे असतात. मात्र पैशा अभावी लाकडे खरेदी करण्यात अनियमितता येत असल्याने, नागरिकांना ओले लाकडे दिले जातात. यामुळे नागरिकांच्या रोषाला स्मशानभूमी ट्रस्ट सामोरी जात आहे. महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे गोरगरीब व गरजू नागरिकांना मोफत लाकडे द्यावे का? असा प्रश्न स्मशानभूमी ट्रस्ट समोर उभा टाकल्याची प्रतिक्रिया स्मशानभूमी ट्रस्टचे मेघनाथ लुंड यांनी दिली.
मोफत लाकडाचे पैसे लवकरच - डॉ पगारे
स्मशानभूमी ट्रस्ट कडून अंत्यसंस्कार साठी पुरविण्यात आलेले मोफत लाकडाचे बिल मिळाले. बिल देण्यासाठी लेखा विभागाकडे पाठविल्याची माहिती वैधकीय अधिकारी दिलीप पगारे यांनी दिली. तसेच त्यांचे इतर बिलेही लवकरच देण्याचे संकेत पगारे यांनी दिले