लोकमत न्यूज नेटवर्कसफाळे : पालघर तालुक्यातील केळवा रोड भागातील झांझरोळी धरणाच्या बाहेरील बाजूस पाणी सोडण्याच्या दिशेने शनिवारी सकाळी १० च्या सुमारास भगदाड पडले. त्यामुळे येथील आठ गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणातील पाणी कमी करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असून नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.
गेल्या चाळीस वर्षांपासून १७ गावांना या धरणातून पाणीपुरवठा होत आहे. पावसाळ्यात काही प्रमाणात गळती झाल्याचे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी कळवले होते, मात्र पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्याने बंधाऱ्याला भगदाड पडल्याचे ग्रामस्थ प्रकाश सावर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. दरम्यान, धरणाला गळतीची सुरुवात झाल्याने पाणबुड्यांच्या साहाय्याने ताडपत्री लावली होती, मात्र गळती सुरूच राहिल्याने भगदाड पडले. त्यामुळे धरणालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून, त्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. या धरणाच्या आतील भागात मातीने भराव टाकण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी डाॅ. माणिक गुरसळ यांनी घटनास्थळी धाव घेत पाणीसाठ्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर प्रांत अधिकारी धनाजी तोरसकर, तहसीलदार सुनील शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावित यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलील दल तैनात केले होते. प्रकाश सावर, योगेश पाटील व राजेश म्हात्रे हे जेसीबीसह डंपर घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
सतर्कतेचा इशारादातीवरे, खार्डी, मथाने, एडवण, कोरे, भादवे, चटाळे, नगावे, विळंगी केळवे, माहीम, दांडा, माकुणसार, आगरवाडी, उसरणी, केळवे रोड या १७ गावांना पाणीपुरवठा या बंदरातून होत होता. देवीचापाडा, साईपूजा, गॅलेक्सी, पठारीपाडा, गोदरेपाडा, झांझरोळी, देवशेतपाडा, मंडळपाडा या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता हिलाल सुखदेव खलाणे यांनी दिली.