बाळकुम परिसरात असलेल्या रुणवाल आयरीन या ४० मजली इमारतीवरून लिफ्ट कोसळून ३५ ते ४० वयोगटातील सहा कामगारांचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. या अपघातात एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.
बाळकुम येथील नारायणी शाळेच्या बाजूला रुणवाल आयरीन या नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या ४० मजली इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. हे काम संपवून कामगार खाली येत असताना लिफ्टचा दोर तुटल्याने रविवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी बाळकुम अग्निशमन दलाला दिली. ही माहिती मिळताच तातडीने बाळकुम अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी ओमकार वैती आपल्या पकासह घटनास्थळी पोहोचले. ही माहिती मिळताच स्थानिक माजी नगरसेवक संजय भोईर यांनी दुर्घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यात मदत केली.
बचाव पथकाने लिफ्टमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. या दुर्घटनेत पाच कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोन गंभीर जखमी कामगारांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी अन्य एकाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या सहा झाली आहे. ही दुर्घटना नेमकी कशी घडली? याबाबत अधिक तपास करण्यात येत असून यातील मृतांची ओळखही पटविण्यात येत आहे. उत्तरीय तपासणीसाठी सर्व मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
या दुर्घटनेतील मृतांची नावे-
महेंद्र चौपाल (३२ वर्षे ), रूपेश कुमार दास (२१), हारून शेख (४७ ), मिथलेश (३५), कारिदास (३८ ) आणि एक अनाेळखी अशा सहा जणांचा मृत्यू झाला. सुनील कुमार दास (२१) हा कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या घटनेस जबाबदार संबंधित ठेकेदाराची चाैकशी करण्यात येत आहे. यात हलगर्जी केल्याचा तसेच सदाेष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे पाेलिस निरीक्षक संदीप धांडे यांनी सांगितले. अन्य एका मृत कामगाराची ओळख पटविण्यात येत आहे. हे सर्व कामगार मूळचे बिहारचे रहिवासी असल्याचे पाेलिस निरीक्षक संजय निंबाळकर यांनी सांगितले.
अशी घडली घटना
रविवारी सायंकाळी ५.३५ च्या सुमारास बाळकुमच्या रुणवाल कॉम्प्लेक्स या ठिकाणी तळ अधिक ४० या आयरीन इमारतीच्या तसेच तीन मजली भूमिगत पार्किंग असलेल्या चाळिसाव्या मजल्यावर लिफ्टचा रोप तुटल्याने अपघात झाला. यात लिफ्ट भूमिगत पार्किंगच्या बेसमेन्टमध्ये कोसळली. यामध्ये सात कामगार अडकले होते. घटनास्थळी अग्निशमन दलासह आपत्ती व्यवस्थापन विभागाने धाव घेत बचावकार्य केले. सुनील कुमार या जखमीला उपचाराकारिता ठाण्यातील निपुण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे .
तांत्रिक बाबी तपासणार-
दुर्ष्घटनाग्रस्त रुणवाल आयरिन या इमारतीचे संदीप रुणवाल हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या ष्घटनेतील जबाबदार लिफ्टचे ठेकेदार, मजूर ठेकेदार, अभियंता यांची चौकशी करण्यात येणार आहे. सर्व तांत्रिक बाबी तपासून दोषींविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली.